WPL 2023 : तब्बल 202 चं स्ट्राईक रेट..13 चौकार.. अन् एक षटकार; हेलीनं हादरवलं, RCB चा सलग दुसरा पराभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women's Premier League

WPL 2023 : तब्बल 202 चं स्ट्राईक रेट..13 चौकार.. अन् एक षटकार; हेलीनं हादरवलं, RCB चा सलग दुसरा पराभव

Women's Premier League : मुंबईची सालामीवीर हेली मॅथ्यूजने आरसीबीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. हेलीने 38 चेंडूत केलेल्या नाबाद 77 धावांच्या जोरावर मुंबईने आरसीबीचे 156 धावांचे आव्हान 14.2 षटकातच पार केले. मुंबईने सामना 9 विकेट्सनी जिंकत WPL लीगमधील आपला सलग दुसरा विजय साजरा केला. मॅथ्यूजला नॅट सिवर ब्रंटने नाबाद 55 धावा करत चांगली साथ दिली.

मॅथ्यूजने आपल्या 202.63 च्या सरासरीने 38 चेंडूत नाबाद 77 धावा ठोकल्या. त्यात 13 चौकार आणि 1 षटकार देखील मारला. याचबरोबर मॅथ्यूजने गोलंदाजीतही दमदार कामगिरी केली. तिने 4 षटकात 28 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या.

रॉयल चॅलेंजर बेंगलोरचे 156 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने दमदार सुरूवात केली. सलामीवीर हेली मॅथ्यूजने पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलला. तिला यस्तिका भाटियाने 19 चेंडूत 23 धावा करत चांगली साथ दिली. मात्र तिला प्रिती बोसने बाद करत ही जोडी फोडली. मात्र त्यानंतर मॅथ्यूजने नॅट सिवर ब्रंटच्या साथीने मुंबईला 10 षटकात 95 धावांपर्यंत पोहचवले. हेलीने 26 चेंडूत अर्धशतकी खेळी केली.

हेली नंतर नॅट सिवर ब्रंटनेही आपला गिअर बदलला. तिने 29 चेंडूत नाबाद 55 धावा ठोकत मॅथ्यूजसोबत तिसऱ्या विकेटसाठी 114 धावांची धडाकेबाज भागीदारी रचली. या भागीदारीच्या जोरावर मुंबईने 14.2 षटकातच आरसीबीचे 156 धावांचे आव्हान पार केले.

तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर बेंगलोरने मुंबई इंंडियन्सविरूद्ध दमदार सुरूवात केली. मात्र त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी आरसीबीचे 4 फलंदाज अवघ्या 2 षटकात गारद करत सामन्यावर आपली पकड पुन्हा निर्माण केली. मात्र आरसीबीच्या मधल्या फळीतील रिचा घोष (28), कनिका अहुजा (22) श्रेयांका पाटील (23) यांनी आरसीबीला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले. मुंबईने आरसीबीला 155 धावात रोखले. मुंबईकडून हेले मॅथ्यूजने 3 तर सैका इशाक आणि एमेलिया केर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....