रायडू म्हणतो, 'त्या' वक्तव्याबाबत मला काहीच वाटत नाही

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

आता निवृत्तीच्या निर्णयावर घुमजाव करून रायडू देशांतर्गत क्रिकेट हैदराबाद संघातून खेळणार आहे. भारतीय संघातही परतण्याची त्याची इच्छा आहे.

चेन्नई : भारतीय संघात मधल्या फळीत फलंदाजी करणारा अंबाती रायडू सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत येत असतो. गेल्या काही महिन्यांपासून तो वारंवार बीसीसीआयच्या सदस्यांविषयी माध्यमांमध्ये बोलतो आहे. आज पुन्हा एकदा त्याने मध्यंतरी केलेल्या वक्तव्याबाबत मत व्यक्त केले आहे. 

- भारतीय संघाचा सपोर्ट स्टाफ जाहीर; अखेर 'हेच' झाले बॅटींग कोच

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्यानंतर निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांना उद्देशून 'थ्रीडी गॉगल'बाबत केलेल्या ट्विटबद्दल आपल्याला कोणताही खेद नाही, असे मत अंबाती रायडूने व्यक्त केले आहे. 

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड समितीने रायडूला वगळून विजय शंकरला स्थान दिले. या खेळाडूकडे 'थ्री डायमेन्शन' खेळ करण्याची क्षमता असल्याचे प्रसाद यांनी त्यावेळी म्हटले होते. विश्‍वकरंडक सामने पहाण्यासाठी आपण थ्रीडी गॉगल मागवला असल्याचे ट्विट करून रायडूने टीका केली होती. त्यानंतर बदली खेळाडू म्हणून अगोदर रिषभ पंत नंतर मयांक अगरवालची निवड करण्यात आली, पण रायडूचा विचार झाला नव्हता, निराश होऊन त्याने काही दिवसात क्रिकेट सोडण्याचा निर्णय जाहीर केला. 

- नव्या बॅटींग कोचने आल्या आल्याच केला पंतचा पत्ता कट

आता निवृत्तीच्या निर्णयावर घुमजाव करून रायडू देशांतर्गत क्रिकेट हैदराबाद संघातून खेळणार आहे. भारतीय संघातही परतण्याची त्याची इच्छा आहे. मी केलेल्या ट्‌विटबाबत कोणताही खेद नाही, विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यान जे घडले त्याचा माझ्यावर परिणाम होणार नाही, विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळण्याची मी मानसिक तयारी केली होती, मला खेळायचे होते, परंतु कोणाला संघात घ्यायचे हा त्यांचा निर्णय होता. कशी संघ रचना असावी याबाबत त्यांचे विचार पक्के होते. कोणताही पक्षपातीपण न करता त्यानी संघहिताला प्राधान्य दिले होते, असे रायडू म्हणाला. 

व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, नोएल डेव्हिड आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ व्यवस्थापनामुळे मी निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पुन्हा खेळणे पसंत केले आहे, असे रायडूने स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I dont think anything about that statement says Ambati Rayudu