मला मनापासून 2019 चा विश्वकरंडक खेळायचा होता : युवराजसिंग

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

हो, मला 2019चा विश्वकरंडक खेळायचा होता. 2015मध्ये झालेला विश्वकरंडक खेळता आला नव्हता तेव्हा मला खूप वाईट वाटले होते. तेव्हा रणजी क्रिकेटमध्ये मी चांगली कामगिरीही करत होतो. मात्र, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी शब्दांत मांडू शकत नाही.

नवी दिल्ली : जेव्हा 2017मध्ये युवराजसिंगने भारताच्या एकदिवसीय संघात दणक्यात पुनरागमन केले होते तेव्हा अनेकांना हा विश्वास होता की तो 2019मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडकात नक्कीच खेळणार. 2011मध्ये झालेल्या विश्वकरंडकात त्याने संपूर्ण मालिकेत सर्वोत्तम खेळी करत भारताला विश्वकरंडक जिंकविण्यात मोठा वाटा उचलला होता. त्यामुळेच त्याच्या चाहत्यांची त्याने 2019चा विश्वकरंडकही खेळावा अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काहीच झाले नाही. युवराजने मात्र, त्याला 2019चा विश्वकरंडक खेळायचा होता असे मत व्यक्त केले आहे. 

18 महिने झाले, प्लिज आता तरी मला वन-डे खेळू द्या ना

''हो, मला 2019चा विश्वकरंडक खेळायचा होता. 2015मध्ये झालेला विश्वकरंडक खेळता आला नव्हता तेव्हा मला खूप वाईट वाटले होते. तेव्हा रणजी क्रिकेटमध्ये मी चांगली कामगिरीही करत होतो. मात्र, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी शब्दांत मांडू शकत नाही,'' असे मत युवराजने व्यक्त केले. 

त्याने पुनरागमन केल्यावर दुसऱ्याच सामन्यात कारकिर्दीतील सर्वोत्तम 150 धावांची खेळी केली. मात्र, त्यानंतर त्याचा फॉर्म खालावला. त्याचे वय वाढल्याने संघ व्यवस्थापनानेही त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर संघातून वगळले. आणि त्यानंतर त्याला पुन्हा संघात स्थान मिळालेच नाही. परिणामी त्याला 2019मध्ये झालेल्या विश्वकरंडकासाठीही संघात स्थान देण्यात आले नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I Wanted To Play 2019 World Cup Says Yuvraj Singh