स्मृती-दीप्तीची फिफ्टी; मितालीला गिफ्ट देण्याचा दिसला इरादा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ICC women s World Cup 2022 INDW VS WIW

स्मृती-दीप्तीची फिफ्टी; मितालीला गिफ्ट देण्याचा दिसला इरादा

ICC women s World Cup 2022 : महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील सराव सामन्यात भारतीय महिलांनी स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाला पराभूत केल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडीजला मोठ्या फरकाने पराभूत केले. रंगिओराच्या मेनपावर ओवल मैदानात ृMainpower Oval, Rangiora रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय महिला संघाने निर्धारित 50 षटकात 258 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीज महिला संघ 9 बाद 177 धावांपर्यंतच मजल मारु शकला.

भारतीय संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीची स्फोटक बॅटर शफाली वर्मा (Shafali Verma) पहिल्याच षटकात बाद झाली. त्यानंतर स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा या दोघींनी संघाचा डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी दोघींनी 118 धावांची भागीदारी रचली. दुखापतीतून सावरुन भारतीय संघाच्या डावाला सुरुवात करणारी बॅटर स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने 7 चौकाराच्या मदतीने 67 चेंडूत 66 धावांची दमदार खेळी केली. दुसऱ्या बाजूला दीप्ती शर्मा (Deepti Sharma) हिने 64 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 51 धावा केल्या. या दोघींशिवाय यश्तिका भाटिया 42 (53) आणि कर्णधार मिताली राज 30(42) धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी खेळी करणाऱ्या हरमनप्रितला या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती.

भारतीय महिला संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजची सुरुवातही खराब झाली. सलामीची बॅटर डिएंड्रा डॉटिन ही अवघी एक धाव करुन माघारी फिरली. ठराविक अंतराने संघाला धक्क्यावर धक्के बसत राहिले. हेली मॅथ्यूज Hayley Matthews 44 (61) आणि शेमेन कॅम्पबेले Shemaine Campbelle (wk) 63 (81) धावा वगळता अन्य कोणत्याही बॅटरला मैदानात तग धरता आला नाही. परिणामी वेस्ट इंडिजचा संघ निर्धारित 50 षटकात 177 धावांपर्यंतच पोहचू शकला. भारताकडून पूजा वस्तारकरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्माला प्रत्येकी दोन दोन विकेट्स मिळाल्या.

महिला वर्ल्ड कपच्या मुख्य स्पर्धेला 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे. याआधी दोन सराव सामने जिंकून भारतीय महिला संघाने कर्णधार मितालीला खास गिफ्ट देण्याचा इरादा स्पष्ट केलाय. पाकिस्तान महिला संघाविरुद्धच्या सामन्याने भारतीय महिला संघ 6 मार्चला या स्पर्धेला सुरुवात करेल.