टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला दिली मोठी शिकवण, कोच लँगरचीही कबुली

सकाळ ऑनलाइन टीम
Tuesday, 19 January 2021

हा पराभव आम्हाला दीर्घ काळापर्यंत लक्षात राहील. भारताला पूर्ण श्रेय जाते. आम्ही यातून धडा घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे कधी कोणती गोष्ट सहज घेऊ नये आणि दुसरं म्हणजे भारतीयांना कधी कमी समजू नका.

ब्रिस्बेन- दुखापतींचा सामना करत असलेल्या अनुभवहीन टीम इंडियाकडून झालेल्या पराभवाचा ऑस्ट्रेलियन कोच जस्टिन लँगर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. भारताला कधीच कमी लेखू नका, असा सल्ला त्यांनी दिला आहे. टीम इंडियाने गाबा येथे झालेल्या चौथ्या कसोटीत विजय मिळवत मालिका 2-1 ने जिंकली आहे. भारताने 3 विकेटने हा सामना जिंकला.

लँगरने चॅनल सेव्हनला म्हटले की, ही चांगली कसोटी मालिका होती. शेवटी एकजण पराभूत होतो तर एक जण विजय मिळवतो. आज कसोटी क्रिकेटचा विजय झाला आहे. हा पराभव आम्हाला दीर्घ काळापर्यंत लक्षात राहील. भारताला पूर्ण श्रेय जाते. आम्ही यातून धडा घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे कधी कोणती गोष्ट सहज घेऊ नये आणि दुसरं म्हणजे भारतीयांना कधी कमी समजू नका. भारताची लोकसंख्या दीड अब्ज आहे आणि जर तुम्ही त्यांच्या 11 खेळाडूंमध्ये असाल तर तुम्ही नक्कीच एक मजबूत आणि दमदार खेळाडू असणार. 

हेही वाचा- INDvsENG : टीम इंडियाची घोषणा; कोहलीच्या नेतृत्वाखाली ईशांत हार्दिक पांड्या करणार कमबॅक​

लँगरने म्हटले की, एडलेडमध्ये 36 धावांवर संपूर्ण संघ बाद झाल्यानंतर भारताने शानदार पुनरागमन केले होते. विशेषतः जसप्रित बुमराह आणि रवींद्र जडेजासारखे मोठे खेळाडू जायबंदी असतानाही चमकदार कामगिरी केली. भारताचे जितके कौतुक करावे तितके ते कमी आहे. पहिल्या सामन्यात तीन दिवसांत पराभूत झाल्यानंतरही त्यांनी जिद्द सोडली नाही आणि तितक्याच जोशाने ते परतले. यातून आम्हाला मोठा धडा मिळाला आहे. यापुढे आता भारताला कधी सहज घेणार नाही. 

हेही वाचा- सावधान इंडिया! आनंदानं हुरळून जाऊ नका; इंग्लंडच्या दिग्गजाचा इशारा​

विजयाचा सूत्रधार असलेल्या ऋषभ पंतच्या 89 धावांच्या नाबाद खेळीबाबत ते म्हणाले की, त्याने जबरदस्त खेळी केली. मला हेंडिग्लेमधील बेन स्टोक्सची फलंदाजी आठवली. तो निडरपणे खेळला आणि त्याची कामगिरी अविश्वसनीय राहिली. शुभमन गिलनेही चांगली फलंदाजी केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ind vs aus Australian coach Justin Langer indian cricket team