
IND vs AUS: नाचता येईना अंगण वाकडे! ऑस्ट्रेलिया मीडिया स्वतःच्या संघावरच घसरला
India vs Australia Nagpur Test : टीम इंडियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफीची सुरुवात शानदार केली आहे. नागपूर कसोटीत भारताने पाहुण्यांचा 132 धावांनी धुव्वा उडवला मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या लाजिरवाण्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन मीडिया पूर्णपणे तोंडावर पडले आहे. पहिल्या डावातच भारतीय फिरकीपटूंनी पाहुण्यांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. त्यानंतर खेळपट्टीबाबत भारतावर गंभीर आरोप करण्यात आले.
हे प्रकरण इथेच संपले नाही, तर भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजावरही ऑस्ट्रेलियन मीडियाने बॉल टॅम्परिंगचा आरोप केला होता. जडेजाने संपूर्ण सामन्यात एकूण 7 विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात टीम इंडियाचा फिरकी मास्टर अश्विनने आपली जादू दाखवली, त्यामुळे संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या 91 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियन मीडियाने जेवढे भारतावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ते सर्व फेल झाले. आता ऑस्ट्रेलिया मीडिया स्वतःच्या संघावरच घसरला आहे.
फॉक्स स्पोर्टच्या मते ट्रॅव्हिस हेडला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतले नाही ही ऑस्ट्रेलियाची मोठी चूक होती. तसेच पुढील सामन्यात कॅमेरून ग्रीनला घालण्याची मागणी केली. दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. आता पाहुण्या संघाला पुढील कसोटीत पुनरागमन करता येते का, हे पाहावे लागेल.
ऑस्ट्रेलियन मीडियाने फिरकी खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर टीम इंडियाने आपल्या फलंदाजीने त्याला उत्तर दिले. रोहित शर्माने शानदार शतकी खेळी खेळली. त्यानंतर रवींद्र जडेजाच्या 60 आणि अक्षर पटेलच्या 84 धावांच्या जोरावर भारताने 400 धावांचा टप्पा गाठला. जडेजाच्या या कामगिरीनंतर त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कारही मिळाला आहे.