
Sarfaraz Khan : BCCIने पुन्हा एकदा सरफराज खानला डावललं! मयंक अग्रवालकडे सोपवली मोठी जबाबदारी
Sarfaraz Khan Irani Cup 2022-23 : बॉर्डर गावसकर मालिकेत युवा फलंदाज सर्फराज खानला स्थान मिळाले नाही. तो सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, त्यानंतरही तो टीम इंडियाचा भाग बनू शकलेला नाही. या सगळ्यामध्ये सरफराज खानशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे, ज्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. भारतीय निवड समितीने पुन्हा एकदा सरफराज खानकडे दुर्लक्ष केले आहे.

इराणी चषकाचा सामना 1 ते 5 मार्च दरम्यान कॅप्टन रूपसिंग स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. हा सामना मध्य प्रदेशचा संघ आणि शेष भारताचा संघ यांच्यात होणार आहे. कर्नाटकचा फलंदाज मयंक अग्रवालला शेष भारताचा कर्णधार बनवण्यात आले आहे. याशिवाय रणजी चषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या सरफराज खानला संघात स्थान मिळालेले नाही.
सरफराज खानचा उर्वरित भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. रणजी ट्रॉफी 2023 हंगामातील 6 सामन्यात 92.66 च्या सरासरीने 556 धावा केल्यानंतरही सर्फराज खानला संघात स्थान मिळले नाही.
गेल्या तीन मोसमात जबरदस्त धावा करणाऱ्या सरफराज खानला मुंबईतील डीवाय पाटील टी-20 चषकात खेळताना झालेल्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे आठ ते 10 दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. सर्फराज सध्या कोलकाता येथे दिल्ली कॅपिटल्सने आयोजित केलेल्या फिटनेस शिबिरात दुखापतीवर उपचार घेत आहे.