
IND va AUS : विराट भाऊ भारताला मिळून देणार WTC फायनलचं तिकीट, जाणून घ्या कसे...
India vs Australia Test : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात 289 धावा केल्या होत्या. स्टार फलंदाज विराट कोहली 59 आणि रवींद्र जडेजा 16 धावांवर खेळत आहे. कोहली आणि जडेजा यांच्यात आतापर्यंत 44 धावांची भागीदारी झाली आहे. पहिल्या डावाच्या आधारे भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियापेक्षा 191 धावांनी मागे आहे.
तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती उत्कृष्ट होती. आता चौथ्या दिवशीही भारतीय संघाला असाच दमदार खेळ दाखवावा लागणार आहे. असं असलं तरी पहिल्या डावात भारत किती धावसंख्या करेल त्यावरून सामन्याची दिशा ठरवली जाईल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियासाठी हा सामना जिंकणे खूप महत्वाचे आहे आणि ड्रॉ चालणार नाही. अशा स्थितीत चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांनाही धावगती थोडी वाढवावी लागेल.
कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही दिवसाची सुरुवातीची वेळ अत्यंत महत्त्वाची मानली जाते. म्हणजेच विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या नाबाद फलंदाजांना चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात सावध फलंदाजी करावी लागणार आहे. सलामीचा तास एकही विकेटशिवाय गेला, तर कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियावर पूर्णपणे वर्चस्व गाजवू शकतात.
खेळपट्टी अजूनही फलंदाजीसाठी अनुकूल आहे आणि भारतीय संघाला आज 80 षटकांच्या आसपास फलंदाजी करायला नक्कीच आवडेल. यात भारतीय संघ यशस्वी ठरला तर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियावर दडपण येऊ शकते.
चौथ्या दिवसाच्या खेळात सर्वांच्या नजरा 59 धावांवर नाबाद असलेल्या विराट कोहलीवर असतील. विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधील तीन वर्षांहून अधिक काळ शतकाचा दुष्काळ संपवण्याची सुवर्णसंधी आहे. कोहलीने नोव्हेंबर 2019 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये शेवटचे शतक झळकावले होते. तेव्हापासून भारतीय चाहते किंग कोहलीच्या 28व्या कसोटी शतकाची वाट पाहत आहेत.
अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिल्यास काय होईल?
अहमदाबाद कसोटी सामना अनिर्णित राहिला किंवा भारतीय संघ पराभूत झाला तर टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात. अशा स्थितीत त्याला श्रीलंका-न्यूझीलंड मालिकेतील निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील कोणत्याही एका सामन्यात न्यूझीलंड संघ जिंकला किंवा अनिर्णित राहिला तर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल.