WPL 2023 GGW vs DCW : गुजरातची घसरण! कापने निम्मा संघ गारद करत GG चा उडवला थरकाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women's Premier League 2023 Marizanne Kapp

WPL 2023 GGW vs DCW : गुजरातची घसरण! कापने निम्मा संघ गारद करत GG चा उडवला थरकाप

Women's Premier League 2023 Marizanne Kapp : वुमन्स प्रीमियर लीगचा नववा सामना हा गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. आजच्या सामन्यात गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीच्या मारिझाने कापच्या भेदक माऱ्यासमोर गुजरातला 20 षटकात 9 बाद 105 धावांपर्यंतच मजल मारता आली. गुजरातकडून किम ग्राथने 32 धावांची झुंजार खेळी केली.

मात्र दिल्ली कॅपिटल्सची वेगवान गोलंदाज मारिझान काप सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर गुजरात जायंट्स समोर काळ म्हणून उभी राहिली. तिने दुसऱ्याच चेंडूवर सलामीवीर साबिनेनी मेघनाचा त्रिफळा उडवला. यानंतर आपल्या पुढच्याच षटकात लॉरा वॉलवॉर्डचा देखील 1 धावेवर त्रिफळा उडवून दोनही सलामीवीरांची शिकार केली. यानंतर पुढच्याच चेंडूवर अॅश्लेघ गार्डनरला पायचित पकडत हॅट्ट्रिकची संधी निर्माण केली.

तीन षटकात 9 धावात 3 फलंदाज बाद झाल्यानंतर गुजरातचा डाव हरलीन देओल आणि हेमलता यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र शिखा पांडेने हेमलताला 5 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. पुढच्याच षटकात कापने 14 चेंडूत 20 धावा करणाऱ्या हरलीन देओलला बाद करत गुजरातची अवस्था 5 षटकात 5 बाद 28 अशी केली.

मारिझाने कापने आपल्या शेवटच्या षटकात सुषमा वर्माचा 2 धावांवर त्रिफळा उडवत आपला पाचवा बळी टिपला. मारिझाने कापने गुजरातचा निम्मा संघ 4 षटकात 15 धावा देत गारद केला.

गुजरातची अवस्था 6 बाद 33 धावा झाल्यानंतर जॉर्जिया वॉरहम आणि किम गार्थने डाव सावरत गुजरातला अर्धशतकी मजल मारून दिली. या दोघींनी सातव्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी रचली. मात्र राधा यादवने जॉर्जियाचा 22 धावांवर त्रिफळा उडवत संघाला सातवे यश मिळवून दिले. याचबरोबर गुजरातची अवस्था 7 बाद 66 अशी झाली.

यानंतर किम ग्राथने 33 चेंडूत 28 धाा करत गुजरातला शंभरीच्या जवळ पोहचवले होते. मात्र शिखा पांडेने स्नेह राणाला 2 धावांवर बाद करत कर्णधाराची शिकार केली. गुजरातची 9 बाद 96 धावा अशी अवस्था झाली असताना ग्राथने शेवटच्या षटकात गुजरातला 105 धावांपर्यंत पोहचवले. तिने 37 चेंडूत नाबाद 32 धावांची झुंजार खेळी केली.

Sports Latest News)

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण