IND vs AUS Test: जडेजा अन् अश्विनसमोर कांगारू पुन्हा ढेपाळले! दिल्ली कसोटीत दणदणीत विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Australia 2nd Test

IND vs AUS Test: जडेजा अन् अश्विनसमोर कांगारू पुन्हा ढेपाळले! दिल्ली कसोटीत दणदणीत विजय

India vs Australia 2nd Test : नागपुरात ऑस्ट्रेलियाला नमवल्यानंतर टीम इंडियाने दिल्ली कसोटीतही कांगारूला धुळ चारली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना भारतीय संघाने सहा गडी राखून जिंकला आहे. यासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. दिल्ली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने कहरच केला. रवींद्र जडेजाने 7 तर आर अश्विनच्या खात्यात 3 विकेट घेतल्या.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना भारताने 262 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात 113 धावांवर गारद झाला आणि भारतासमोर 115 धावांचे लक्ष्य ठेवले. टीम इंडियाने तिसर्‍याच दिवशी चार विकेट गमावून हे लक्ष्य गाठले.

आज सकाळी पहिल्या सत्रातच अश्विन-जडेजा जोडीने तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यानंतर मार्नस लबुशेन देखील आऊट केले. त्यानंतर पुढच्या षटकात जडेजाने पीटर हँड्सकॉम्ब आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सची सलग 2 चेंडूत शिकार केली. भारताने दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले, आणि दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या 113 धावांत गारद झाला. जडेजाने सात आणि अश्विनने तीन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याच्याशिवाय फक्त मार्नस लबुशेन (35) दुहेरी आकडा गाठू शकला.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला चांगली सुरुवात झाली नाही. केएल राहुलला पुन्हा एकदा फ्लॉप राहिला. पहिली विकेट 6 धावांवर पडल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने आक्रमक भूमिका घेतली. त्याने 20 चेंडूत 31 धावा केल्या. 3 चौकार आणि 2 षटकार मारले. जरी तो अर्धशतक गाठू शकला नाही आणि धावबाद झाला.

चेतेश्वर पुजार आणि विराट कोहली यांनी 39 धावांवर 2 विकेट पडल्यानंतर धावसंख्या 69 धावांवर नेली. 31 चेंडूत 20 धावा केल्यानंतर कोहलीला ऑफस्पिनर टॉड मर्फीने यष्टीचीत केले. यानंतर श्रेयस अय्यर 6 धावा करून लायनचा दुसरा बळी ठरला. पुजारा आणि केएस भरत नाबाद राहिले. दोघेही संघाला विजयी करून परतले.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 263 धावा केल्या. उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकॉम्ब यांनी सुरेख अर्धशतके झळकावली. भारताकडून शमीने चार आणि अश्विन-जडेजाने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.

प्रत्युत्तरात भारताने खराब सुरुवात करूनही 262 धावा केल्या. अक्षर पटेलने शानदार अर्धशतक झळकावले आणि अश्विनसोबत शतकी भागीदारी केली. विराट कोहलीनेही 44 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने पाच विकेट घेतल्या.