IND vs AUS : टीम इंडियाला मोठा धक्का! अहमदाबाद कसोटी सोडून श्रेयस अय्यर हॉस्पिटलमध्ये... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs aus test shreyas iyer-back-injury-and-has-gone-to-hospital

IND vs AUS : टीम इंडियाला मोठा धक्का! अहमदाबाद कसोटी सोडून श्रेयस अय्यर हॉस्पिटलमध्ये...

Ind vs Aus Test Shreyas Iyer : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची चौथी आणि शेवटची कसोटी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जात आहे. या सामन्यात कांगारूंनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी भारतीय फलंदाजीदरम्यान संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पाठदुखीमुळे फलंदाजीसाठी मैदानात आला नाही. तो स्कॅनसाठी रुग्णालयात गेला आहे.

मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला पाठदुखीचा त्रास होत असल्याने तो अद्याप पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेला नाही. अय्यर बहुतांशी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतो, पण अहमदाबाद कसोटीत रवींद्र जडेजा आणि केएस भरत त्याच्यापुढे आले. बीसीसीआयने सांगितले की, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरने पाठीच्या खालच्या भागात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.

श्रेयस अय्यरची ही दुखापत कितपत गंभीर आहे आणि तो पहिल्या डावात फलंदाजी करू शकेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाठीच्या दुखापतीमुळे तो मालिकेतील पहिला सामना खेळू शकला नाही.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाच्या 480 धावांसमोर भारताने वृत्त लिहिपर्यंत पहिल्या डावात 4 विकेट गमावून 318 धावा केल्या आहेत. यावेळी केएस भरत विराट कोहलीसोबत क्रीजवर उपस्थित आहे. शतकवीर शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जडेजाच्या रूपाने कर्णधार रोहित शर्मासह भारताला चार धक्के बसले आहे. ऑस्ट्रेलियाकडे अजूनही 150 धावांची आघाडी आहे.

पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि अष्टपैलू कॅमेरून ग्रीन यांच्या शतकांच्या जोरावर संघाला एवढी मोठी धावसंख्या गाठता आली. अश्विनने या काळात सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेत टीम इंडिया सध्या 2-1 ने पुढे आहे.