WTC Final: अहमदाबाद कसोटी संपण्यापूर्वीच टीम इंडिया WTC फायनलमध्ये? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs aus test WTC Final Scenario new-zealand-have-to-score-257-more-runs-to-win-test-vs-sri-lanka Team India in final

WTC Final: अहमदाबाद कसोटी संपण्यापूर्वीच टीम इंडिया WTC फायनलमध्ये?

WTC Final Scenario : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सध्या क्राइस्टचर्चच्या मैदानावर खेळल्या जात आहे. या सामन्यात श्रीलंकेचा दुसरा डाव 302 धावांवर आटोपला, त्यानंतर यजमान न्यूझीलंडला सामन्याच्या चौथ्या डावात विजयासाठी 285 धावांचे लक्ष्य मिळाले. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून ही कसोटी मालिका श्रीलंका आणि भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

भारतीय संघ सध्या अहमदाबाद येथील घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा शेवटचा सामना खेळत आहे. या कसोटी सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला किंवा त्यात भारताचा पराभव झाला, तर श्रीलंकेला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी असेल. यासाठी श्रीलंकेच्या संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांवर नाव कोरावे लागेल.

शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी 257 धावा करायच्या आहेत. त्याचवेळी श्रीलंकेचा संघ विजयापासून 9 विकेट दूर आहे. जर न्यूझीलंड संघाने हे लक्ष्य गाठले तर टीम इंडिया आरामात अहमदाबाद कसोटी संपण्यापूर्वीच WTC फायनलमध्ये जाऊ शकतो.

आतापर्यंत श्रीलंकेच्या संघाने पहिल्या कसोटी सामन्यात चेंडू आणि बॅट या दोन्ही बाबतीत चांगली कामगिरी केली आहे. श्रीलंकेच्या संघाच्या दुसऱ्या डावात अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजने 115 धावांची शानदार खेळी करत अडचणीतून बाहेर पडण्याचे काम तर केलेच शिवाय अधिक चांगले लक्ष्य देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय दिनेश चंडिमलने 42 तर धनंजया डी सिल्वाने 47 धावांची शानदार खेळी केली.

न्यूझीलंडकडून श्रीलंका संघाच्या दुसऱ्या डावात ब्लेअर टिकनर आणि मॅच हेन्री यांनी गोलंदाजीत 4 आणि 3 बळी घेतले. त्याचबरोबर कर्णधार टीम साऊदीनेही 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तत्पूर्वी, पहिल्या डावात 373 धावा करून न्यूझीलंडने श्रीलंकन ​​संघाच्या पहिल्या डावातील धावसंख्येवरून थोडीशी आघाडी घेतली होती.