T20 World Cup : भारत पोहचणार! पाकिस्तानला अजूनही आहे का सेमी फायनलची संधी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

t20 world cup Pakistan Semi-final Qualification

T20 World Cup : भारत पोहचणार! पाकिस्तानला अजूनही आहे का सेमी फायनलची संधी?

t20 world cup Pakistan Semi-final Qualification : टी-20 विश्वचषक 2022 च्या महत्त्वाच्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशचा 5 धावांनी पराभव केला. त्यामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग सुकर झाला आहे. अॅडलेड ओव्हलवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 6 बाद 184 धावा केल्या. यानंतर पावसामुळे बांगलादेशला 16 षटकांत 151 धावांचे लक्ष्य मिळाले, परंतु त्यांना सहा विकेट्सवर 145 धावाच करता आल्या.

हेही वाचा: Dinesh Karthik : कार्तिकच्या रनआउटवरून गोंधळ, ICC चा नियम काय सांगतो?

भारतीय संघ गट-2 मध्ये अव्वल स्थानी आला आहे त्यांच्यासाठी उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग अधिक सोपा झाला आहे. त्याचबरोबर पाकिस्तान, बांगलादेश आणि झिम्बाब्वेसारख्या संघांच्या अडचणी वाढल्या आहेत. टीम इंडिया आपल्या गटात पहिल्या स्थानावर राहून उपांत्य फेरी जाऊ शकते. भारताचे चार सामन्यांनंतर सहा गुण आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला आता झिम्बाब्वेविरुद्धचा शेवटचा सामना जिंकावा लागेल. हा सामना हरल्यानंतरही टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचू शकते, पण तेव्हा भारताला नशिबाची साथ आणि दुसऱ्या संघांवर अवलंबून रहावे लागेल.

हेही वाचा: Rohit Sharma : शेवटचं षटक अर्शदीप सिंगलाच का दिलं; रोहित म्हणाला मी त्याला विचारलं...

बांगलादेशविरुद्ध भारताचा विजय म्हणजे पाकिस्तानी संघाचा प्रवास आता खूपच खडतर झाला आहे. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना गमावल्यास बाबर ब्रिगेड स्पर्धेबाहेर होईल. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकला तरी त्याचे सहा गुण होतील. या स्थितीत भारताने शेवटचा सामना गमावला तर त्याचा रनरेट पाकिस्तानपेक्षा कमी होईल आणि पाकिस्तान चांगल्या रनरेटच्या आधारे सेमीफायनलमध्ये पोहोचेल.

दुसरीकडे, जर दक्षिण आफ्रिकेने दोन्ही सामने गमावले तर आफ्रिकेचे पाच गुण होतील आणि पाकिस्तान सहा गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचेल. दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानकडून पराभव झाला तरी पुढच्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव करून ते उपांत्य फेरी गाठू शकतात. त्यामुळे पाकिस्तान उपांत्य फेरीत जाईल याची शक्यता जरा कमी आहे.

बांगलादेशची परिस्थिती आता जवळपास पाकिस्तानसारखीच झाली आहे. तसेच उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्याला प्रथम पाकिस्तानचा पराभव करावा लागेल. नंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकच्या पराभवाची प्रार्थना करावी लागले. अशा स्थितीत बांगलादेशला उपांत्य फेरी गाठण्याचे समीकरण सोपे नाही.