Ind vs Ban : पुण्याच्या सामन्यावेळी ट्रॅफिक क्लीन बोल्ड! क्रिकेटप्रेमींसह गावकऱ्यांना त्रास, वृद्धाच्या अंत्यविधीला साडेसहा तास विलंब

Ind vs Ban world cup 2023
Ind vs Ban world cup 2023

Ind vs Ban world cup 2023 : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील भारत विरुद्ध बांगलादेश सामना गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर गुरुवारी रंगतदार झाला. मात्र, स्टेडियमकडे जाणारे मामुर्डी व गहुंजे गावातील अरुंद रस्ते, दुचाकींसह चारचाकी मोटारीतून आलेल्या प्रेक्षकांच्या वाहनांची झालेली कोंडी, अपूर्ण व आडमार्गे उभारलेले वाहनतळे यामुळे पुण्यासह मुंबई, नाशिक, सातारा, नगर, कोल्हापूरकडून आलेले क्रिकेटप्रेमी स्टेडियमध्ये वेळेत पोचू न शकल्याने ‘धावचीत’ झाले.

वाहन पार्क करण्यासाठी स्टेडियमभोवती गोल गोल फिरण्याची वेळही त्यांच्यावर आली. त्यांच्या अडचणींचा ‘सामना’ स्टेडियमबाहेरच रंगला आणि अडथळ्यांचे ‘बळी’ ठरलेल्यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गापासून अवघ्या शंभर मीटरवर गहुंजे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम आहे. मात्र, तिथपर्यंत जाण्यासाठी मामुर्डी व गहुंजे गावातून रस्ता आहे.

Ind vs Ban world cup 2023
Ind vs Ban : 'मला माफ कर मित्रा...', सामनावीर बनल्यानंतर कोहलीने जडेजाची मागितली माफी, जाणून घ्या प्रकरण

द्रुतगती मार्गावरून स्टेडियमपर्यंत जाण्यासाठी शिरगाव व गहुंजे यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाजवळ छोटी वाट केली आहे. तेथून तात्पुरत्या स्वरूपात बसवलेल्या लोखंडी फाटकातून पोलिस व व्हीआयपी वाहने सोडली जात होती. क्रिकेटप्रेमींच्या वाहनांसाठी गहुंजे परिसरात आणि द्रुतगती मार्गाच्या शिरगाव-सांगवडेकडील बाजूला शेतांमध्ये वाहनतळे उभारली होती. तिथपर्यंत जाण्यासाठी एकेरी मुरूम व माती टाकून तात्पुरते रस्ते तयार केले होते. काही वाहनतळे गहुंजे-शिरगाव रस्त्यालगत होते. मात्र, त्यांची क्षमता कमी असल्याने लांब जावे लागत होते. वाहतूक नियंत्रण व सुरक्षिततेसाठी सुमारे ३५० पोलिस व अधिकारी नियुक्त केले होते.

अंत्ययात्रेला साडेसहा तास विलंब

मामुर्डीतील ज्येष्ठ नागरिकाचे सकाळी साडेआठला वृद्धापकाळाने निधन झाले. काही तासांनी अंत्यविधी होणे अपेक्षित होते. पण, वाहतूक कोंडीमुळे दुपारचे तीन वाजले तरी आम्ही अंत्यसंस्कारासाठी पवनानदी काठावरील स्मशानभूमीत पोचू शकलो नाही. पोलिसांनी वाहतुकीचे योग्य नियोजन न केल्यानेच आमच्या कुटुंबावर ही वेळ आल्याचा संताप विजयेंद्र राऊत यांनी व्यक्त केला.

दृष्टिक्षेपात गैरसोय

  • देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरील भुयारी मार्गापासून मामुर्डी मार्गे खड्ड्यांचा रस्ता

  • गहुंजे गावातून स्टेडियमपर्यंत जाणारा रस्ताही अरुंद

  • शेतांमध्ये उभारलेली तात्पुरती वाहनतळे अपुरी

  • रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करून अनेकांनी स्टेडिअम गाठल्याने कोंडी

  • स्थानिक स्कूलबस, स्कूलरिक्षा, स्कूलव्हॅन व पीएमपी बसही कोंडीत अडकल्या

काय करायला हवे

  • मामुर्डी व गहुंजे गावातील रस्ते रुंदीकरणाची गरज

  • रस्त्याच्या कडेची गटारे बंदिस्त करायला हवीत

  • स्टेडियमपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे बुजवून डांबरीकरण करायला हवे

  • वाहनतळ लांब उभारून स्टेडियमपर्यंत जाण्यासाठी पीएमपी बसची व्यवस्था केल्यास कोंडी टळू शकेल

  • सामन्यापूर्वी वाहनतळ कुठे आहे, स्टेडियमपर्यंत कसे जावे, याबाबतच्या सूचना प्रसिद्ध कराव्यात

  • प्रशस्त वाहनतळ उभारण्याची गरज, तात्पुरत्या वाहनतळांवर पोहोचण्यासाठी रस्त्यांचे सपाटीकरण हवे

आमच्या गावातील रस्ता छोटा आहे. आज वाहनांची संख्या वाढली आहे. गटार खोल आहे. सकाळपासून तीन-चार वाहने त्यात अडकली होती. दोन मोटारसायकलवाले गटारात पडले. क्रिकेट पहायला जाणाऱ्यांसाठी स्वतंत्र रस्ता करायला हवा.

- नंदा राऊत, गृहिणी, गहुंजे

स्टेडियमच्या चारही बाजूला मोफत पार्किंगची व्यवस्था केली आहे पण, चारचाकी वाहनांतून लोक आल्यामुळे कोंडी झाली.

- सतीश नांदुरकर, पोलिस निरीक्षक, वाहतूक

सामन्यापूर्वी ठराविक तासात लोक मोठ्या प्रमाणात वाहने घेऊन येतात. कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यावेळी असेच होते. स्टेडियमवर लोकांना सोडताना सुरक्षेच्यादृष्टीने काही घातपात होऊ नये म्हणून काळजी घेऊनच तपासणी करून सोडावे लागले. वाहतूक कोंडी झालीच नाही.

- बापू बांगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com