esakal | IND vs ENG 4th Test: टीम इंडियाच्या फलंदाजांची पुन्हा तारांबळ
sakal

बोलून बातमी शोधा

England-Cricket-Team

IND vs ENG 4th Test: टीम इंडियाच्या फलंदाजांची पुन्हा तारांबळ

sakal_logo
By
विराज भागवत

भारताची खराब सुरूवात; पहिल्या सत्रावर इंग्लंडचे वर्चस्व

Ind vs Eng 4th Test Live Updates: भारत-इंग्लंड कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत असताना चौथ्या कसोटीत भारताची सुरुवात खराब झाली. पहिल्या सत्रात भारताने दोन्ही सलामीवीर आणि एक अनुभवी फलंदाज गमावला. नाणेफेकीनंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला स्विंग गोलंदाजीने पुन्हा हैराण केला. तसेच, अचानक चेंडूला मिळणाऱ्या उसळीपुढे भारतीय फलंदाजांची पुन्हा एकदा तारांबळ उडाली. पहिल्या सत्रावर इंग्लंडने संपूर्ण वर्चस्व राखत भारताला लंच ब्रेक होईपर्यंत ३ बाद ५४ धावांपर्यंतच मजल मारून दिली.

टॉस जिंकून जो रूटने भारताला फलंदाजी दिली. रोहित आणि राहुल या सलामी जोडीने सुरूवात चांगली केली होती. पण एका अचानक बाऊन्स झालेल्या चेंडूवर रोहित बाद झाला. त्याने ११ धावा केल्या. पाठोपाठ राहुलही १२ धावांवर पायचीत झाला. DRSमध्ये पंचांचा कॉल (Umpires Call) अंतिम ठरल्याने भारताचा रिव्ह्यू शाबूत राहिला पण राहुलला माघारी जावे लागले. त्यानंतर चेतेश्वर पुजारादेखील जेम्स अँडरसनच्या स्विंग गोलंदाजीचा शिकार झाला. त्याला केवळ ४ धावाच करता आल्या. त्यानंतर विराटची साथ करण्यासाठी रविंद्र जाडेजाला पाठवण्यात आले. उजव्या हाताचे फलंदाज झटपट बाद होत असल्याने कदाचित फलंदाजी क्रमवारीत बदल केल्याचे काहींनी म्हटले. जाडेजाने सत्र संपेपर्यंत कोहलीला चांगली साथ दिली.

विराटने गाठला २३ हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा

पहिल्या सत्रात भारताच्या चाहत्यांना फारसे आनंदाचे क्षण मिळाले नाहीत. पण इंग्लंडचा जेम्स अँडरसन गोलंदाजी करत असताना त्याला सणसणीत चौकार लगावत विराटने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २३ हजार धावांचा टप्पा पार केला. डावातील १८व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विराटने अँडरसनला दमदार चौकार खेचला आणि भीमपराक्रम केला. विराट हा २३ हजार धावांचा टप्पा सर्वात जलदगतीने गाठणारा फलंदाज ठरला. त्याने ४९० डावांमध्ये हा पल्ला गाठला तर सचिनला यासाठी ५२२ डाव खेळावे लागले होते. ५०० डावांपेक्षा कमी डावात २३ हजार धावांचा टप्पा गाठण्याचा विश्वविक्रम विराटने केला.

loading image
go to top