VIDEO : ती 15 सेकंदाची चूक अन् न्यूझीलंड पराभवाच्या छायेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs NZ
VIDEO : ती 15 सेकंदाची चूक अन् न्यूझीलंड पराभवाच्या छायेत

VIDEO : ती 15 सेकंदाची चूक अन् न्यूझीलंड पराभवाच्या छायेत

IND vs NZ 1st Test : कानपूरच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. चौथ्या दिवसाअखेर भारतीय संघाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर 284 धावांचे लक्ष्य ठेवले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाने पहिली विकेट गमावली आहे. अखेरच्या दिवसात त्यांना 280 धावा करायच्या आहेत.

चौथ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरच्या क्षणी मैदानात कमालीचा ड्रामा पाहायला मिळाला. विल यंग (Will Young) ची चूक न्यूझीलंडला गोत्यात आणणारी ठरली. ही चूक न्यूझीलंडच्या पराभवाला काणीभूत ठरु शकते. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावातील तिसऱ्या षटकात अश्विनच्या गोलंदाजीवर विल यंग बाद झाला. अश्विनच्या चेंडूवर त्याने फ्रंटफूटवर येऊन बचावात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू वळला आणि यंगच्या पॅडवर आदळला. अंपायर विरेंद्र शर्माने त्याला पायचित दिले.

15 सेकंदाचा ड्रामा, अन्....

पहिल्या डावात लॅथम आणि यंगने 151 धावांची मजबूत भागीदारी केली होती. यावेळी दोघांच्या कमालीचा ताळमेळ दिसला. पण ज्यावेळी दुसऱ्या डावात यंगला पायचित बाद देण्यात आले त्यावेळी लॅथमने त्याची मदत केली नाही. रिव्ह्यू घ्यावा की नाही असा प्रश्न विल यंगच्या डोक्यात सतावताना दिसला. दोघांनी एकमेकांशी चर्चा केली. पण वेळेत रिव्ह्यू घेण्यात ते कमी पडले. नियमानुसार, पंचांनी बाद दिल्यानंतर 15 सेकंदात रिव्ह्यू घ्यावा लागतो. त्यांचे 15 सेकेंद होताच अजिंक्य रहाणे आणि अश्विन पंचांकडे पाहून रिव्ह्यूची वेळ संपल्याचा इशाराही करताना दिसले आणि यंगला तंबूत परतावे लागले.

जर रिव्ह्यू घेतला असता तर....

ज्यावेळी सलामी जोडीने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळी वेळ संपली होती. त्यामुळे विल यंगला तंबूत परतावे लागले. रिप्लायमध्ये तो बाद नव्हता हे स्पष्ट दिसत होते. जर या दोघांनी वेळेत रिव्ह्यू घेतला असता तर न्यूझीलंडने चौथ्या दिवसाअखेर पहिली विकेट गमावली नसती. ही चूक न्यूझीलंडच्या पराभवाचे एक कारणही ठरू शकते.