IND VS PAK : भारत-पाक सामन्याचीच सर्वत्र चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND VS PAK Cricket Match

IND VS PAK : भारत-पाक सामन्याचीच सर्वत्र चर्चा

दुबई : इतर कोणतेही क्रिकेट सामने आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना या लढतीचे महत्त्व नेहमीच वेगळे असते. खेळाडूंना त्याचे दडपण असते तसेच संयोजक आणि पाठीराख्यांनाही असते. या दोघांमधील लढती फक्त आयसीसीच्या स्पर्धा किंवा आशिया कप या प्रकारात होतात. साहजिकच त्याची लज्जत अजून वाढते म्हणूनच संयोजकांना हमखास आर्थिक फायदा होतो. टीव्ही प्रक्षेपणाचे हक्क चढ्या भावाने विकले जातात आणि सामन्याची तिकिटे हातोहात संपतात. हेच सर्व लक्षात घेऊन संयोजकांनी स्पर्धेची मांडणी या दोघांमध्ये किमान दोन लढती होतील आणि दोन्ही संघ अंतिम सामन्यात पोहोचले तर तिसरी लढत होईल अशी केली आहे.

येत्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाक संघांना मुद्दाम एका गटात ठेवले गेले आहे, जिथे त्यांच्यात पहिली लढत २७ तारखेला होईल. ३ संघांच्या दोन गटांतून प्रत्येकी दोन संघ पुढील फेरीत जातील जिथे ते चार संघ आपापसात परत खेळतील. म्हणजे तिथे भारत पाकिस्तान दुसरी लढत ४ सप्टेंबरला होण्याची शक्यता निर्माण केली गेली आहे आणि अर्थातच अपेक्षेप्रमाणे सगळे झाले तर हेच २ संघ ११ सप्टेंबरला अंतिम सामन्यात भिडतील. थोडक्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका भारत वि. पाकिस्तानदरम्यान होईल अशी मांडणी केली गेली आहे.

आशिया कप स्पर्धा भारत-पाकिस्तान संघांकरिता मनाची आहे. त्यातून मुख्य टी-२० वर्ल्ड कप जवळ येऊन ठेपला आहे. बुधवारी पाकिस्तान संघाने दुपारी ४ ते ६ च्या ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त उन्हात सराव केला. भारतीय संघाने किंचित ऊन सरल्यावर (३९ अंश सेल्सिअस) संध्याकाळी ६ ते ८ आयसीसीच्या सराव सुविधेत मेहनत केली. सरावासाठी जाता-येता भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांशी मजेत बोलत होते. मैदानावर खुन्नस असली तरी बाहेर संबंध चांगले दिसले. खास करून विराट कोहली आणि पाकिस्तानचा कप्तान बाबर आझम खूप आपुलकीने एकमेकांना भेटले तो क्षण छायाचित्रकारांसाठी पर्वणीचा होता.

Web Title: Ind Vs Pak India Pakistan Cricket Match Asia Cup Tournament

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..