
INDW vs UAEW: शेफाली-श्वेताची बॅट पुन्हा कडाडली! भारताचा 122 धावांनी दणदणीत विजय
U19 Women's T20 WC: महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. भारताने दुसऱ्या सामन्यात यूएईचा 122 धावांनी पराभव केला आहे. सलग दुसऱ्या विजयासह भारतीय संघाने गुणतालिकेत आपल्या गटात अव्वल स्थान कायम राखले असून पुढील फेरीत भारताचा खेळ जवळपास निश्चित झाला आहे.
भारताला आता ग्रुप स्टेजमध्ये फक्त स्कॉटलंडशी खेळायचे आहे. या सामन्यातही भारतीय संघाचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. यूएई संघाविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 219 धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात यूएईचा संघ केवळ 97 धावा करू शकला आणि 122 धावांच्या मोठ्या फरकाने सामना गमावला.
हेही वाचा: Maharashtra Kesari: सिकंदर विरोधात चार गुण देणाऱ्या पंचाला पोलिस शिपायाने दिली धमकी
नाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार शेफाली वर्मा आणि श्वेता सेहरावत या जोडीने पुन्हा एकदा भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून 8.3 षटकात 111 धावा जोडल्या. या जोडीने पॉवरप्लेमध्येच 68 धावा केल्या. यानंतर शेफाली वर्मा 34 चेंडूत 78 धावा करून बाद झाली. त्याने 12 चौकार आणि चार षटकार मारले.
श्वेता सेहरावतही यानंतर 49 चेंडूत 74 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. त्याने 10 चौकार मारले. मात्र, हे दोघेही बाद होईपर्यंत भारताची धावसंख्या 200 धावांपर्यंत पोहोचली होती. यानंतर रिचा घोषने 29 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 49 धावा केल्या. अखेरीस टीम इंडियाने तीन गडी गमावून 219 धावा केल्या.