World Cup 2019 : अफगाणिस्तानने झुंजविले पण विजय भारताचाच; शमीची हॅटट्रिक

सुनंदन लेले
रविवार, 23 जून 2019

लख्खं सूर्य प्रकाशात भारत वि अफगाणिस्तान सामन्याला प्रारंभ झाला. भारताने शमीला संघात घेण्याचा अपेक्षित निर्णय घेतला. विराट कोहलीने नाणेफेकही जिंकली. फलंदाजीसाठी पोषक वातावरणात भारताने प्रथम फलंदाजी घेतली. अफगाणिस्तानने फिरकीने सुरवात करण्याचे दाखवलेले धाडस यशस्वी ठरले. मुजीब उर रहमान याने आपल्या दुसऱ्याच षटकांत रोहित शर्माला बाद केले आणि त्यानंतर महंमद नाबी, रशिद खान या अन्य फिरकी गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजीला रोखून धरले. त्यांना क्षेत्ररक्षकांकडूनही सुरेख साथ मिळाली. 

साऊदम्प्टन : विश्‍वकरंडक स्पर्धेत आतापर्यंत सफाईदार विजय मिळविणाऱ्या भारतीय संघाचे शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात थोडक्‍यात निभावले. फलंदाजीतील संथपणा महागात पडण्याची भिती गोलंदाजांनी कमी केली आणि भारताने 11 धावांनी विजय मिळविला. अफगाणिस्तानची झुंज मोडून काढताना भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. वेगवान गोलंदाज महंमद शमी याने हॅटट्रिक मिळवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेतील ही पहिलीच, तर भारताची विश्‍वकरंडक स्पर्धेतील दुसरी हॅटट्रिक ठरली. 

अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळविताना धावगती वाढविण्याकडे लक्ष ठेवण्याचे मनसुबे आज मात्र धुळीला मिळाले. चेंडूला उंची न देता गोलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले. अशा कठिण परिस्थितीतही कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधव यांची अर्धशतकी खेळी झाल्याने भारताला 50 षटकांत 8 बाद 224 धावा करता आल्या. त्यानंतर गोलंदाजांनी आपली जबाबदारी चोख पार पाडून अफगाणिस्तानला 49.5 चेंडूत 213 धावांत रोखले. त्यांच्या महंमद नाबीने अर्धशतकी खेळून अखेरच्या टप्प्यातील फटकेबाजीने सामन्यातील चुरस वाढवली होती. मात्र, शमीच्या यॉर्करने त्याच्यासह अफगाणिास्तानचा खेळ खल्लास केला. महंमद शमीने 40 धावांत 4 गडी बाद केले. 
त्यापूर्वी, लख्खं सूर्य प्रकाशात भारत वि अफगाणिस्तान सामन्याला प्रारंभ झाला. भारातने शमीला संघात घेण्याचा अपेक्षित निर्णय घेतला. विराट कोहलीने नाणेफेकही जिंकली. फलंदाजीसाठी पोषक वातावरणात भारताने प्रथम फलंदाजी घेतली.

अफगाणिस्तानने फिरकीने सुरवात करण्याचे दाखवलेले धाडस यशस्वी ठरले. मुजीब उर रहमान याने आपल्या दुसऱ्याच षटकांत रोहित शर्माला बाद केले आणि त्यानंतर महंमद नाबी, रशिद खान या अन्य फिरकी गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजीला रोखून धरले. त्यांना क्षेत्ररक्षकांकडूनही सुरेख साथ मिळाली. 

भारताकडे त्यानंतरही लोकेश राहुल, विराट कोहली, विजय शंकर, हार्दिक पंड्या, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी अशी तगडी फलंदाजी होती. अशा फलंदाजीमुळे भारताला धावांचा डोंगर कठिण नव्हता. पण, धावांसाठी त्यांनी घेतलेल्या अधिक चेंडूंमुळे त्यांचे सगळे गणि चुकले हेच या सामन्यातील पूर्वार्धाचे सार म्हणता येईल. 

रोहितची विकेट झटपट पडल्यावर लोकेश राहुल खूप सावध खेळला, तर विराटने जणू मागच्या सामन्यातील खेळी पुढे चालू केली. स्थिरावण्याकरता भरपूर वेळ घेतलेल्या राहुलने महंमद नबीच्या ज्या चेंडूवर विनाकारण रिव्हर्स स्वीपचा फटका मारताना सोपा झेल दिला. कोहलीने थाटात फलंदाजी करत अर्धशतकी मजल सहज मारली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विजय शंकरने 29 धावा करताना मोठी छाप पाडली नाही. डावाच्या मध्यात विजय आणि कोहली पाठोपाठ बाद झाल्याने भारतीय फलंदाजांवर दडपण आले. याचा फायदा अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी अचूक उचलला. केदार-धोनीने अर्धशतकी भागीदारी केली, पण त्यात वेग नव्हता. हार्दिकला शेवटी ठेवल्यानंतर तो देखील दडपणाचा बळी ठरला. "रिव्ह्यू'मुळे केदार वाचला. त्यानंतर विश्‍वकरंडक स्पर्धेतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. अर्थात, त्यामुळे भारताला किमान सव्वा दोनेशेच्या जवळ जाता आले. 

अखेरच्या दहा षटकांत रहमान आणि नाबी यांची षटके संपल्यानंतरही रशीदने टिच्चून मारा केल्याने भारतीय फलंदाजांना स्वातंत्र्य घेता आले नाही. संथ खेळपट्टीवर अफगाणिस्तान गोलंदाजांनी नियोजनबद्ध मारा करताना वेग अजून कमी केल्याने फटके मारणे भारतीय फलंदाजांना जमलेच नाही. एकूण डावात 15 चौकार आणि एकमेव षटकार मारला गेला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India beat Afghanistan in World Cup 2019