esakal | भारताचा दक्षिण आफ्रिकेला 'व्हाइट वॉश'; गोलंदाज चमकले 
sakal

बोलून बातमी शोधा

cricket

भारताने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका संघाला 'व्हाइट वॉश' देण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज (मंगळवार) तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताला केवळ दोन गडी बाद करायचे होते. शाहबाझ नदीमने नववा गडी बाद केला. त्यानंतर त्याच्याच गोलंदाजीवर अखेरचा गडी बाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 133 धावांत संपुष्टात आला. 

भारताचा दक्षिण आफ्रिकेला 'व्हाइट वॉश'; गोलंदाज चमकले 

sakal_logo
By
सुनंदन लेले

रांची : गोलंदाजांच्या आणखी एका भरीव कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवीत दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश दिला आहे. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली. 

भारताने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका संघाला 'व्हाइट वॉश' देण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज (मंगळवार) तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताला केवळ दोन गडी बाद करायचे होते. शाहबाझ नदीमने नववा गडी बाद केला. त्यानंतर त्याच्याच गोलंदाजीवर अखेरचा गडी बाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 133 धावांत संपुष्टात आला. 

त्यापूर्वी, सोमवारी भारतीय गोलंदाजांनी दिवसभरात 16 फलंदाज बाद केले होते. दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 162 धावांत गुंडाळल्यावर दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेरीस त्यांची 8 बाद 132 अशी अवस्था केली होती. त्यानंतर हा डाव 133 धावांत आटोपला. उमेश यादव आणि महंमद शमी हे वेगवान गोलंदाज भारताच्या यशाचे शिल्पकार होते. तिसऱ्या दिवसाच्या प्रारंभी उमेश यादवने दक्षिण आफ्रिकेचा नाबाद फलंदाज फाफ डू प्लेसीच्या यष्ट्या वाकवल्या. त्यानंतर दडपणाखाली झुबेर हमजा आणि तेम्हा बावुमा यांनी काही काळ टिकाव धरला होता. विशेष करून हमझाच्या फलंदाजीत सहजता होती. त्याने वेगवान आणि फिरकी गोलंदाजांना चांगले फटके मारत अर्धशतक ठोकले. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. त्या वेळी जडेजाने हमजाला चकवले. प्रथम त्याच्याविरुद्ध झालेले पायचीतचे अपील फेटाळले गेले. पुढचाच चेंडू टप्पा पडून बाहेर वळण्याऐवजी भसकन आत आला आणि डाव्या यष्टीवर आदळला. 

समोरून शाहबाज नदीमने चेंडूला उंची देत बावुमाला फसवले. यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने बेल्स उडवत त्याला बाद केले. नदीमचा तो पहिला कसोटी बळी ठरला. त्यानंतर जडेजाने एका अफलातून चेंडूवर हेन्रिक क्‍लासेनचा त्रिफळा उद्‌ध्वस्त केला. उपाहारानंतर पीएड्‌टला शमीने पायचित, तर रबाडाला उमेश यादवने धावबाद केले. त्यानंतर 18 षटके नवोदित जोडी नॉर्टिये आणि जॉर्ज लिंड यांनी खेळपट्टीवर तग धरला. गोलंदाजीला परत आल्यावर उमेश यादवने जॉर्ज लिंडला बाद केले. उरलेल्या शेवटच्या फलंदाजाला बाद करायला वेळ गेला नाही. उमेश यादवने 3, तर जडेजा, नदीम आणि शमीने प्रत्येकी 2 फलंदाजांना बाद केले. अश्‍विनला एकही बळी मिळाला नाही. 

फॉलो ऑन मिळाल्यावर पहिला डाव परवडला असे म्हणायची वेळ दक्षिण आफ्रिका संघावर दुसऱ्या डावात आली. दुसऱ्या षटकापासून उमेश यादव आणि महंमद शमी यांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव लिहायला सुरवात केली. उमेश यादवने जणू खेळता न येणारा चेंडू टाकून डिकॉकची उजवी यष्टी फिरायला पाठवली. महंमद शमीने पहिल्या डावात अर्धशतक ठोकणाऱ्या झुबेर हमजाचा बचाव भेदला आणि कर्णधार फाफ डू प्लेसीला पायचित केले. पाठोपाठ शमीने तेम्बा बावुमाला बाद करून दक्षिण आफ्रिकेला सामना वाचविण्यापासूनही किती तरी दूर नेऊन ठेवले. धैर्य दाखवत वेगवान माऱ्याला तोंड देणाऱ्या डीन एल्गरला उमेश यादवचा बाउन्सर खाडकन डोक्‍यावर आदळला तेव्हा काळजात धस्स झाले. पंचांनी त्याच क्षणाला चहापानाची घोषणा केली. 
पहिल्या डावाप्रमाणे जॉर्ज लिंडने थोडा प्रतिकार केला. नदीमच्या दक्ष क्षेत्ररक्षणामुळे जॉर्ज लिंड धावबाद झाल्यावर पाहुण्या संघाला पराभव समोर दिसू लागला. अखेर भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले. 

संक्षिप्त धावफलक 
भारत पहिला डाव 9 बाद 497 घोषित वि. दक्षिण आफ्रिका पहिला डाव 162 (झुबेर हमजा 62 -79 चेंडू, 10 चौकार, 1 षटकार, जॉर्ज लिंड 37, तेम्बा बावुमा 32, उमेश यादव 9-1-40-3, महंमद शमी 10-4-22-2, शाहबाज नदीम 14-3-19-2) आणि दुसरा सर्वबा 133 (थेऊनिस डी ब्रुईन खेळत आहे 30, जॉर्ज लिंड 27, डीन पीएड्‌ट 23, महंमद शमी 9-5-10-3, उमेश यादव 9-1-35-2, रवींद्र जडेजा 13-5-36-1, आर. अश्‍विन 10-3-28-1, नदीम 2-18)