INDvWI : विंडीजचा 67 धावांनी उडवला धुव्वा; तिसऱ्या सामन्यासह भारताने मालिकाही जिंकली!

IND-WI-3T20
IND-WI-3T20

मुंबई : अस्तित्व पणास लागल्यावर चवताळून हल्ला करणे ही टीम इंडियाची खासियत वानखेडे स्टेडियमवर दिसून आली. रोहित-राहुलनंतर विराटचा रुद्रावतार विंडीजला घायाळ करणारा ठरला आणि भलीमोठी धावसंख्या उभारणाऱ्या भारताने 67 धावांनी विजय मिळवत ट्नेन्टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली. 

सूमार गोलंदाजी आणि गचाळ क्षेत्ररक्षण यामुळे मालिका गमावण्याची स्थिती निर्माण झालेल्या भारतीयांनी आजही दोन झेल सोडले पण प्रथम फलंदाजी करताना उभारलेली 240 ही धावसंख्या मालिका विजयाचा झेंडा उभारण्यास पुरेशी होती.

पराभवाची पतरफेड
याच वानखेडे स्टेडियमवर तीन वर्षांपूर्वी टी-20 विश्वकरंडक उपांत्य सामन्यात 180 च्या पलिकडची धावसंख्या उभारूनही भारताचा पराभव झाला होता. तो इतिहास आणि गेल्या दोन सामन्यातील गोलंदाजी-क्षेत्ररक्षणातील अपयश लक्षात घेता आज आपल्याला दोनशे पल्याड धावसंख्याच हवी हा विचार  विराटसेनेने मांडला आणि पोलार्डच्या विंडीजला त्यात चीतपट केले. 

रोहित-राहुलने पेटवला वणवा

सुरुवातीपासून तोफखाना सुरु करणाऱ्या रोहित शर्मा (34 चेंडूत 71) आणि केएल राहुल (56 चेंडूत 91) यांच्या 135 धावांच्या वणव्यात विराट कोहलीने (29 चेंडूत नाबाद 70) तेल ओतले त्यामुळे 240 धावांची भरभक्कम धावसंख्या उभी राहिली. त्यानंतर विंडीजची 3 बाद 17 अशी अवस्था केल्यावर सामन्याचा निकाल स्पष्ट केला.

तीन वर्षांपूर्वी भारताच्या धावांचा पाठलाग करताना लेंडस सिमंसने निर्णायक ठरला होता आज त्याला महम्मद शमीने एकेरी धावात बाद केले त्या अगोदर क्षेत्ररक्षण करताना पाय दुखावलेला एविन लुईस फलंदाजी करू शकला नाही विंडीजचे हे हुकमाचे पत्ते बाद झाल्यावर कर्णधार पोलार्ड आणि हेटमेर यांचा लढा नाममात्र होता. प्रदीर्घ काळानंतर संधी मिळालेला महम्मद शमी हा बदलही निर्णायक ठरला शमीसह भुवनेश्वर आणि दीपक चहर यांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवले. 

उभारली मोठी धावसंख्या

एरवी धावांचा पाठलाग करण्यात तरबेज असलेला भारतीयांनी आम्ही प्रथम फलंदाजी करतानाही मोठी धावसंख्या उभारू शकतो हे सिद्ध केले आणि त्यासाठी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांचा पवित्रा फारच निर्णायक ठरला. या दोघांनी दोन्ही बाजूने विंडीज गोलंदाजांवर हल्ला केला. दहापेक्षा अधिक धावांच्या सरासरीने भारताचा धावफलक वानखेडे स्टेडियमच्या बाजूला असलेल्या पश्चिम रेल्वेपेक्षा अधिक वेगाने पळत होता.

पण विराट कोहलीने तर एक्स्रप्रेस वेगाने गाडी पळवली.
रोहितचा स्ट्राईक रेट 208, केएल राहुलचा 162 तर विराट कोहलीचा स्ट्राईक रेट 241 चा होता यावरून त्यांची स्पोटक फलंदाजी  विंडीजसाठी  किती भिषण होती आणि स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारी होती. या तिघांनी मिळून आज 19 चौकार आणि 16 षटकारांची मेजवानी सादर केली.
- Virushka Anniversary : सर्वांचा विरोध झुगारत अशी फुलली विरुष्काची लव्हस्टोरी

संक्षिप्त धावफलक :

भारत 20 षटकांत 3 बाद 240 ( रोहित शर्मा 71 -34 चेंडू 6 चौकार, 6 षटकार, केएल राहुल 91 -56 चेंडू, 9 चौकार, 4 षटकार, विराट कोहली नाबाद 70 -29 चेंडू 4 चौकार, 7 षटकार, कॉट्रेल 40-1) वि. वि. वेस्ट इंडीज 20 षटकांत 8 षटकांत 173 (शिमरोन हेटमेर 41 -24 चेंडू, 1 चौकार, 5 षटकार, किएरॉन पोलार्ड 68 -39 चेंडू, 5 चौकार, 6 षटकार, दीपक चहर भुवनेश्वर कुमार 37-2, महम्मद शमी 25-2)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com