
पहिल्या डावात 326 धावांची मोठी आघाडी घेतल्यावर भारताने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशी खेळ सुरू होतानाच पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उपाहारापर्यंत त्यांची अवस्था 4 बाद 74 करून आमच आजच विजय मिळवायचा हे ठरले असल्याचे दाखवून दिले.
INDvsSA : भारताचं ठरलंय, आजच जिंकायच
पुणे - पहिल्या डावात 326 धावांची मोठी आघाडी घेतल्यावर भारताने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशी खेळ सुरू होतानाच पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उपाहारापर्यंत त्यांची अवस्था 4 बाद 74 करून आमच आजच विजय मिळवायचा हे ठरले असल्याचे दाखवून दिले. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा तेम्बा बावुमा 2, क्वींटॉन डी कॉक 1 धाव काढून खेळत होते.
तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारताने दक्षिण आफ्रिकेचा प्रतिकार मोडून काढत 275 धावांवर त्यांच्या डावाला पूर्णविराम दिला होता. तेव्हापासून भारत फॉलोऑन देणार की नाही याचीच चर्चा अधिक होती. प्रत्येक जण आपापल्यया परीने आडाखे बांधत होते. अखेरीस भारताने फॉलोऑन दिल्याची बातमी थडकल्यावर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. दक्षिण आफ्रिका संघावर 2008 नंतर प्रथमच फॉलोऑन स्विकारण्याची वेळ आली. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर गेले तीन दिवस सकाळचे सत्र फलंदाजांना त्रासदायक ठरत आले आहे त्याचा फायदा भारतीय गोलंदाज कसा उठवतात हे या पहिल्या सत्राच्या खेळातून दिसणार होते. भारतीय चाहत्यांना हवे तेच झाले. भारतीय गोलंदाजांनी नुसत्या चाहतक्यांचा अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, तर आपले वर्चस्व निर्वीवादपणे सिद्ध केले.
दुसऱ्या डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर इशांत शर्माने दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करम याला परतविले. पंचांनी त्याला बाद ठरवले. मात्र, रिप्लेमध्ये तो नाबाद असल्याचे दिसून आले. दक्षिण आफ्रिकेच्या जोडीने रेफरलची मदत घेतली नाही. त्यानंतर डीन एल्गार आणि थेऊनीस डी ब्रुईन या जोडीने आफ्रिकेचा डाव सावरण्याची धडपड सुरू केली. आक्रमकता हाच उत्तम बचाव असल्याचे दाखवताना त्यांची धांदल उडत होती. त्यांच्या आक्रमकतेत ठोसपणा नव्हता. त्यामुळे कधी चेंडू बॅटची कड घेत, तर कधी हवेतून सीमापार जात होता. त्यांच्या आक्रमकतेत एक प्रकारचा धोका होता. हाच धोका उमेश यादवने गडद केला. त्याच्या लेगसाईडला जाणार्या चेंडूला ग्लान्स करण्याचा ब्रुईनचा प्रयत्न फसला आणि यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने आपल्या डावीकडे झेपावत एक अपलातून झेल पकडला. दक्षिण आफ्रिकेची स्थिती त्या वेळी 2 बाद 21 अशी होती.
एल्गार आणि कर्णधार फाफ डू प्लेसी एकत्र आले होते. या जोडीवर पाहुण्या संघाच्या मोठ्या अपेक्षा होत्या. एल्गर एकीकडे धावा काढत असताना, दुसऱ्या बाजूने डू प्लेसी याला काही केल्या लय गवसत नव्हती. धावा करण्यापेक्षा विकेट राखायची असेच त्याच्या खेळाचतून जाणवत होते. अश्विनच्या एका षटकात त्याच्या विरुद्धचे पायचितचे जोरदार अपील मैदानावरील पंच आणि नंतर तिसऱ्या पंचांनी देखील फेटाळून लावले. तेव्हा 17.3 षटके झाली होती. डू प्लेसी त्या वेळी 5 धावांवर खेळत होता. त्यानंतर एल्गारच्या साथीत त्यांची भागीदारी अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना तुटली. तेव्हाही डू प्लेसी 5 धावांवरच खेळत होता आणि 25.2 षटके झाली होती. तब्बल 54 चेंडू खेळल्यावरही डू प्लेसी केवळ 5 धावा काढून बाद झाला. ही विकेटही साहाची ठरली. प्लेसीचा झेल घेताना दोन वेळा त्याची पकड सुटली होती. चेंडू जमिनीवर पडणार इतक्यात तिसऱ्या प्रयत्नांत त्याने झेल घेतला. त्यानंतर एल्गारचाही संयम सुटला. अश्विनला हवेतून फटकाविण्याच्या नादात त्याने चेंडू टोलविला खरा, पण त्या फटक्यात जान नव्हती. चेंडू हवेत उंच गेला आणि उमेश यादवने झेल घेतला. अर्थात यादवने तिसऱ्या प्रयत्नांत हा झेल घेतला. त्यानंतर डी कॉक आणि तेम्बा बावुमा यांना उपाहारापर्यंतचा वेळ खेळून काढला.
गेली तीन दिवस येथील दुसरे सत्र गोलंदाजांसाठी कष्टाचे ठरले आहे. आता अडचणीत असलेल्या दक्षिण आफ्रिकेसाठी आज हे सत्र कसे राहणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.
Web Title: India Gets Follow South Africa 2nd Test Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..