Dipa Karmakar : भारताची 'गोल्डन गर्ल' दीपा करमाकरवर २१ महिन्यांची बंदी! जाणून घ्या काय आहे कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dipa Karmakar : भारताची 'गोल्डन गर्ल' दीपा करमाकरवर २१ महिन्यांची बंदी! जाणून घ्या काय आहे कारण

Dipa Karmakar : भारताची 'गोल्डन गर्ल' दीपा करमाकरवर २१ महिन्यांची बंदी! जाणून घ्या काय आहे कारण

नवी दिल्ली : भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकर ही उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी सापडली. त्यामुळे तिला २१ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. अशी माहिती आंतरराष्ट्रीय चाचणी संघटनेकडून शुक्रवारी देण्यात आली. मात्र हे निलंबन दोन वर्षांपूर्वीच अर्थातच २०२१मधील ऑक्टोबर महिन्यातच सुरु झाले आहे.

दीपाने हिगेनामाईन याचे सेवन केल्यामुळे उत्तेजक चाचणीत दोषी सापडली. आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट संघटनेकडून हे सॅम्पल घेण्यात आले होते. दीपाने उत्तेजक विरोधी नियमाचा भंग केल्यामुळे तिला निलंबित करण्यात आले. दीपाच्या निलंबनाची सुरुवात ११ ऑक्टोबर २०२१पासून झाली. तिच्या निलंबनाची शिक्षा या वर्षी (२०२३) जुलै महिन्यात १० तारखेला संपणार आहे.

दुखापतींमुळे पाय खोलात

रिओ ऑलिंपिकनंतर दीपाला मोठी कामगिरी करता आलेली नाही. बहुतांशी वेळा ती स्पर्धांपासून दूरच राहिली. यामध्ये दुखापतींचाही तिला फटका बसला. सातत्याने होणाऱ्या दुखापतींमुळे तिचे नुकसान झाले. तसेच उत्तेजके चाचणीत दोषी सापडल्यामुळे तिचे २१ महिनेही वाया गेले.

रिओ ऑलिंपिकमध्ये चौथा क्रमांक

दीपा हिने २०१६च्या रिओ ऑलिंपिकमधील जिम्नॅस्ट या खेळाच्या स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावत सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. चौथ्या स्थानापर्यंत मजल मारणारी दीपा ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली होती. त्यामुळे चोहोबाजूंनी तिचे कौतुकही होऊ लागले.