esakal | भारताने दाखवली हॉकीतील ताकद
sakal

बोलून बातमी शोधा

भारताने दाखवली हॉकीतील ताकद

भारताने आशियाई हॉकीतील आपली वाढती ताकद कोरियास दाखवली. भारताने आशियाई क्रीडा हॉकी स्पर्धेतील सलग चौथा विजय मिळविताना कोरियाचे आव्हान 5-3 असे परतवताना स्पर्धेतील आपल्या एकूण गोलांची संख्या 56 वर नेली. 

भारताने दाखवली हॉकीतील ताकद

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जाकार्ता-  भारताने आशियाई हॉकीतील आपली वाढती ताकद कोरियास दाखवली. भारताने आशियाई क्रीडा हॉकी स्पर्धेतील सलग चौथा विजय मिळविताना कोरियाचे आव्हान 5-3 असे परतवताना स्पर्धेतील आपल्या एकूण गोलांची संख्या 56 वर नेली. 

भारताने स्पर्धेत 54 गोल केल्यावर पहिला गोल स्वीकारला. त्यापूर्वी 212 मिनिटे भारताने एकही गोल स्वीकारला नव्हता. रुपिंदर पाल सिंग (1), सी. एस. कांगूजाम (5), ललित उपाध्याय (16), मनदीप सिंग (49) आणि आकाशदीप सिंग (56) यांनी प्रत्येकी एक गोल करीत भारताचा विजय साकारला. 

भारताला स्पर्धेत प्रथमच माफक आव्हानाचा सामना करावा लागला. पहिल्याच सत्रात तीन गोल केल्यानंतर भारतीय आक्रमण काहीसे थंडावले होते. त्याच वेळी कोरियाने दीर्घ पास करीत भारतीय आक्रमण भेदण्यास सुरवात केली होती. तिसऱ्या सत्रात कोरियाच्या मॅन टू मॅन मार्किंगने भारताची डोकेदुखी वाढवली. हे सत्र संपेपर्यंत भारताची आघाडी एका गोलवर आली होती. चौथ्या सत्राच्या सुरुवातीपासून भारतीय पाठीराख्यांनी "जितेगा इंडिया जितेगा' या घोषणा देण्यास सुरवात केली. मनदीपच्या अप्रतिम स्टीक कौशल्याने भारताची आघाडीच वाढवली नाही, तर कोरियाच्या बचावफळीस जास्त हादरवले. त्याने अखेरच्या क्षणी स्टीकची दिशा बदलत चेंडूला अचूक दिशा दिली होती. त्यातून कोरिया सावरण्यापूर्वी आकाशदीपने गोल करीत कोरियाच्या विजयाची शक्‍यता जणू संपवली. अखेरच्या मिनिटास कोरियाने गोल केला खरा; पण यामुळे निकाल बदलला नाही. 

भारतीय मार्गदर्शक हरेंदर सिंग खेळावर पूर्ण समाधानी नव्हते. तिसऱ्या सत्रात कोरियाने वर्चस्व घेतल्यावर ते खूपच नाराज झाले होते. त्यात दवडलेले पाचही पेनल्टी कॉर्नर, तसेच मैदानी गोलच्या दहापैकी चारच संधींचे रुपांतर त्यांना सतावत होते. कोरियाने सहा पेनल्टी कॉर्नर मिळवले आणि त्यावर दोन गोल केले. ही बाब त्यांना बाद फेरीच्या दृष्टीने जास्त चिंताजनकही वाटत होती.

loading image
go to top