INDvsWI : भारताची गोलंदाजी; नवदीप सैनीचे संघात पदार्पण

वृत्तसंस्था
रविवार, 22 डिसेंबर 2019

नवदीप सैनीवर जबाबदारी 
निर्णायक सामन्यात खेळ उंचावण्याची टीम इंडियाची खासियत आहे. त्यामुळे आजही तसाच तडफदार खेळ अपेक्षित आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध भारतीय संघाचे वर्चस्व असले तरी गोलंदाजीतील उणिवा पुढे आलेल्या आहेत.

कटक : पहिल्या सामन्यातील हादऱ्यानंतर सावरणाऱ्या भारतीय संघाने विशाखापट्टणमला गाडी रुळावर आणली. आता आज (रविवार) होणारा अंतिम सामना जिंकून वेस्ट इंडीजविरुद्ध सलग दहावी मालिका जिंकण्याच्या आशा पुन्हा जागृत केल्या आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतग्रस्त दीपक चहरच्या जागी भारतीय संघात नवदीप सैनीला स्थान मिळाले असून, त्याचे हे वनडे क्रिकेटमधील पदार्पण आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
अगोदर ट्‌वेन्टी-20 मालिकेत मुंबईत झालेल्या निर्णायक सामन्यात विराट कोहलीच्या संघाने धावांचा पर्वत उभा केला होता; तर एकदिवसीय मालिकेत विशाखापट्टणमला हिमालय उभा केला होता, त्यामुळे हतबल झालेल्या वेस्ट इंडीजने शरणागती स्वीकारली होती. 

नवदीप सैनीवर जबाबदारी 
निर्णायक सामन्यात खेळ उंचावण्याची टीम इंडियाची खासियत आहे. त्यामुळे आजही तसाच तडफदार खेळ अपेक्षित आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध भारतीय संघाचे वर्चस्व असले तरी गोलंदाजीतील उणिवा पुढे आलेल्या आहेत, पण विशाखापट्टणम येथील सामन्यात कुलदीप यादवने हॅट्ट्रिक करून इतर गोलंदाजांचेही मनोबल वाढवलेले आहे, परंतु जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत आक्रमणाची धुरा सांभणारा दीपक चहर दुखापतीमुळे आज सामन्यात खेळणार नाही, त्याच्याऐवजी नवदीप सैनीची निवड करण्यात आली आहे. सैनीकडे चांगला वेग आहे, परंतु तो टी-20 सामन्यांत महागडा ठरत असल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते. आजच्या सामन्यातून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

रोहित-राहुलचा फॉर्म 
भारतीय संघ अडचणीत आलेला असताना रोहित शर्मा-केएल राहुल या सलामीवीरांनी भक्कम योगदान दिलेले आहे. मुंबईनंतर विशापट्टणमला याची प्रचीती दिली. रनमशिन विराट कोहली दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भोपळाही फोडू शकला नसला, तरी भारताने 387 धावा केल्या होत्या. विराटसारखा फलंदाज कोणत्याही क्षणी फॉर्मात येऊ शकतो, त्यामुळे विराटची चिंता नसेल. मधल्या फळीच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे श्रेयस अय्यरचे सलग चौथे एकदिवसीय अर्धशतक आणि रिषभ पंतची तुफानी टोलेबाजी भारतीय फलंदाजी अधिक भक्कम करणारी आहे. 

खेळपट्टी फलंदाजीस पोषक 
कटकच्या बाराबती स्टेडियमची खेळपट्टीही विशाखापट्टणमप्रमाणे मुकबल धावा करू देणारी आहे. येथे तीन वर्षांपूर्वी एकदिवसीय सामना झाला होता. त्या सामन्यात भारताने 6 बाद 381 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने 8 बाद 366 पर्यंत मजल मारली होती. 2017 नंतर येथे प्रथम श्रेणीचा सामना झालेला नसला तरी स्थानिक ट्‌वेन्टी-20 स्पर्धेत धावांचा पाऊस पडला होता. त्यामुळे उद्याही तीनशेच्या पलीकडील धावा अपेक्षित आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India have won the toss and elected to bowl against West Indies in Cutttak