World Cup 2019 : धोनी-जडेजा गेले.. सगळं संपलं! वर्ल्ड कपमधून भारत बाहेर

बुधवार, 10 जुलै 2019

न्यूझीलंड गोलंदाजांची अफलातून गोलंदाजी करून 239 धावांची राखण करायची किमया साधून दाखवली. भारतीय फलंदाजीला आव्हान देत गोलंदाजांनी धावा रोखायला नव्हे तर फलंदाजांना बाद करायला मारा केला.  मॅट हेन्रीने पहिल्या स्पेलमधे तीन फलंदाजांना बाद करून दिलेल्या धक्क्यातून भारतीय संघ सावरू शकला नाही

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : न्यूझीलंड गोलंदाजांची अफलातून गोलंदाजी करून 239 धावांची राखण करायची किमया साधून दाखवली. भारतीय फलंदाजीला आव्हान देत गोलंदाजांनी धावा रोखायला नव्हे तर फलंदाजांना बाद करायला मारा केला.  मॅट हेन्रीने पहिल्या स्पेलमधे तीन फलंदाजांना बाद करून दिलेल्या धक्क्यातून भारतीय संघ सावरू शकला नाही. जडेजा (77 धावा) धोनी( 50 धावा) यांनी विक्रमी भागीदारी करूनही भारताचा डाव 221 धावात संपवून न्यूझीलंडने 18 धावांचा विजय संपादताना पाठोपाठच्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात धडक मारायची कमाल करून दाखवली. भारतीय संघाचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न सलग दुसर्‍या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यात भंग पावले. 

बुधवारी सकाळपासून मँचेस्टरची हवा आल्हाददायक झाली. सामना सूर्यप्रकाशात वेळेवर चालू झाला. न्यूझीलंड फलंदाजांच्या मनात जास्तीत जास्त धावा जमा करण्याची योजना होती. रॉस टेलरला रवींद्र जडेजाने अफलातून क्षेत्ररक्षण करून बाद केले आणि कलाटणी मिळाली. भुवनेश्वर कुमारने अजून दोन फलंदाजांना बाद केल्याने न्यूझीलंडचा डाव 8 बाद 239 धावांवर रोखला गेला. ओल्ड ट्रॅफर्डची खेळपट्टी गोलदांजांना थोडी साथ देत असल्यामुळे पाठलाग करायला लागणारी धावसंख्या सहज सोपी नक्कीच नव्हती.

न्यूझीलंड गोलंदाजांनी नव्या चेंडूचा सुरेख वापर केला. ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्रीने चेंडू पुढे टाकल्याचा फायदा झाला. स्वींग होणार्‍या चेंडूने भारतीय फलंदाजांचा घात केला. मॅट हेन्रीच्या स्टंपात पडून बाहेर स्वींग झालेल्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. मग विराट कोहलीला बोल्टने पाायचित केले तेव्हा कोहली किंचित पाय तिरका करून खेळला असल्याचे दिससले. हेन्रीने राहुलला बाहेरच जाणार्‍या चेंडूला बॅट लावायच्या मोहात बाद केले. आणि दिनेश कार्तिकचा जेम्स निशमने जमिनीपासून एका इंचावर अफलातून झेल पकडला. पहिल्या 10 षटकात भारतीय फलंदाजांनी 60पैकी तब्बल 49 चेंडू तटवून खेळून काढले. धावफलक 4 बाद 24ची दारूण अवस्था दाखवू लागला.   
रिषभ पंतने दडपणाखाली चांगला संयम दाखवत फलंदाजी केली. हार्दिक पंड्या खेळायला आल्यापासून विश्वासाने फलंदाजी करत होता. भागीदारी थोडी रंगू लागली असताना सँटनरला षटकार मारायची अवदसा रिषभ पंतला आठवली. 5 बाद 71 धावसंख्येवर महेंद्र सिंह धोनी फलंदाजीला आला. 30 षटकात 92 धावाच जमा करता आल्याने शेवटच्या 20 षटकात 148 धावा करायचे आव्हान उरले.

मिचेल सँटनरने फारच अचूक फिरकी गोलंदाजी केल्याने फलंदाजांवरचे दडपण कधीच कमी झाले नाही. अपेक्षित धावगती सतत वाढत होती. त्याच दडपणाचा परिणाम संयम ठेवलेल्या हार्दिक पंड्यावर झाला. मोठा फटका मारायच्या प्रयत्नात हार्दिक 32 धावांवर झेलबाद झाला. आता अपेक्षांचे ओझे धोनी - जडेचा जोडीवर विसावले. जडेजाने प्रचंड दडपणाखाली अफलातून खेळी सादर केली. पहिल्यापासून सकारात्मक फलंदाजी करत जडेजाने मारलेले फटके आशा जिवंत ठेवणारे होते. जडेजाने 77 धावांची खेळी 4 चौकार 4 षटकार ठोकून सादर केली. पण जडेजाला बोल्टने हळू चेंडू टाकून बाद केले. आणि अफलातून क्षेत्ररक्षणामुळे धोनी अर्धशतकावर धावबाद झाला. तिथेच भारताचे आव्हान संपले. न्यूझीलंडने भारताना डाव 221 धावांवर संपवून 18 धावांचा विजय मिळवला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india lost against new zealand by 18 runs