गैरवर्तणूकीमुळे 'या' सदस्याची विंडीज दौऱ्यातून थेट मायदेशी हकालपट्टी

वृत्तसंस्था
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

गैरवर्तनामुळे क्रिकेट व्यवस्थापकाला दौऱ्यावरून मायदेशी परत बोलाविण्याची नाचक्की भारतीय क्रिकेटवर ओढविली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ताकीद मिळाल्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यातही गैरवर्तन केलेले सुनील सुब्रह्मण्यम याच्यामुळे ही वेळ आली आहे.

नवी दिल्ली : गैरवर्तनामुळे क्रिकेट व्यवस्थापकाला दौऱ्यावरून मायदेशी परत बोलाविण्याची नाचक्की भारतीय क्रिकेटवर ओढविली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ताकीद मिळाल्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यातही गैरवर्तन केलेले सुनील सुब्रह्मण्यम याच्यामुळे ही वेळ आली आहे. त्यांना वेस्ट इंडिजहून परतावे असा आदेश देण्यात आला. विशेष म्हणजे त्याने व्यवस्थापकपदासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर त्याची मुलाखत होणार का हा कळीचा मुद्दा बनला आहे.

कॅरेबियन बेटांवर एका जाहिरातीचे चित्रीकरण होणार होते. त्यासाठी समन्वयाचे काम सुब्रह्मण्यम करेल अशी माहिती दोन उच्चायुक्तालयांना देण्यात आली होती. त्रिनिदाद-टोबॅगोमधील वकिलातीच्या अधिकाऱ्याने संपर्क साधला असता सुब्रह्मण्यमने त्यांना दाद दिली नाही.

याविषयी भारतातील एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने प्रशासकीय समितीला कल्पना दिली. त्यानंतर सुब्रह्मण्यमचे दिवस भरले. ही चूक नकळत घडल्याचा पवित्रा त्याने घेतला, पण देशाचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे अशा चुकीचे समर्थन होऊ शकत नाही. त्यामुळे त्याने परत यायलाच हवे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत झाले.

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये पर्थ कसोटीदरम्यान सुब्रह्मण्यमने काही कर्मचाऱ्यांना अनुचित वाटेल असे वर्तन केल्याची तक्रार "क्रिकेट ऑस्ट्रेलिया'चे कार्यकारी व्यवस्थापक ऍडम फ्रेझर यांनी केली होती. त्यानंतर ऐतिहासिक विजयाचा जल्लोष म्हणून काही वस्तूंची तजवीज करण्यात आली होती. त्यात वापर न झाल्यामुळे शिल्लक राहिलेल्या वस्तू सुब्रह्मण्यमने लंपास केल्या. त्यावेळी त्याला ताकीद देण्यात आली होती. नंतर विश्‍वकरंडक स्पर्धेदरम्यान सुद्धा मंडळाचे पदाधिकारी त्याच्या वर्तनाविषयी फारसे समाधानी नव्हते.

पदासाठी मुलाखत होणार?
ऑस्ट्रेलिया दौरा व विश्‍वकरंडक स्पर्धेत अनुचित वर्तन करूनही सुब्रह्मण्यम बचावला होता. यावेळी वेस्ट इंडीमध्ये वकिलातीच्या अधिकाऱ्यांचा संबंध असतानाच हे घडले. त्यामुळे प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांना कारवाई करणे भाग पडले. त्यासाठी त्यांच्यावर दडपण होते. आता सुब्रह्मण्यम परतल्यावर त्याने व्यवस्थापक पदासाठी केलेल्या अर्जावर मुलाखतीबाबत काय निर्णय होतो याकडे तज्ञांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India manager Sunil Subramaniam called back from West Indies