जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत आशियाई विक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 World Athletics Championships

भारताचा मिश्र रिले संघ विक्रमी कामगिरीसह अंतिम फेरीत

नागपूर : प्रथम व्हिसाची अडचण, त्यानंतर तिकिटाचा प्रश्न या सर्व अडचणींवर मात करीत ३० तासांच्या प्रवासानंतर भारतीय ज्युनिअर ॲथलेटिक्स संघातील काही खेळाडू दक्षिण अमेरिकेतील कोलंबियामधील कॅली येथे दाखल झाले आणि काही तासांतच ४-४०० मिश्र रिले संघाने ज्युनिअर (२० वर्षे) जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत आशियाई विक्रम करीत अंतिम फेरीही गाठली.

मुंबई येथून निघालेले हे खेळाडू ॲमस्टरडॅम, बोगोटा मार्गे कॅलीत दाखल झाले. काही तासांची झोप घेतल्यानंतर स्पर्धेत सहभागी होण्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि थेट स्पर्धेत उतरले. भरत श्रीधर, प्रिया मोहन, कपिल व रूपल चौधरी या चौकडीने तिसऱ्या हिटमध्ये (प्राथमिक फेरी) भन्नाट कामगिरी करीत ३ मिनिटे १९.६२ सेकंदात शर्यत पूर्ण केली आणि अव्वल स्थान मिळवले.

ही कामगिरी करताना भारतीय संघाने गेल्या वर्षी नैरोबीत केलेला ३ मिनिटे २०.६० सेकंदांचा स्वतःचाच आशियाई विक्रम मोडीत काढला. नैरोबीत ब्राँझपदक जिंकलेल्या भारतीय संघातील भरत, प्रिया आणि कपिल येथे सहभागी झाले आहेत.

अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या आठ संघात भारतीय संघ अमेरिकेपाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, मुलींच्या आठशे मीटर शर्यतीत आशाकिरण बारलाने उपांत्य फेरीत स्थान मिळवले. तिने २ मिनिटे ९.०१ सेकंद वेळ दिली. मुलांच्या गोळाफेकीत संयम संजयची अंतिम फेरी केवळ ०.०१ सेंटिमीटरने हुकली. त्याने १८.३१ मीटरवर गोळा फेकला आणि त्याला १३ वे स्थान मिळाले.

Web Title: India Mixed Relay Team Enters Final World Athletics Championships

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top