ऑलिंपिक पात्रता हॉकीत भारत-पाकिस्तान लढत?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

ऑलिंपिक हॉकी स्पर्धेस पात्र ठरण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होण्याची शक्‍यता आहे. या लढतीचा अंतिम ड्रॉ उद्या (ता. 9) ठरणार आहे, पण ड्रॉ साठीच्या मानांकनानुसार भारत-पाक लढतीची शक्‍यता आहे.

मुंबई : ऑलिंपिक हॉकी स्पर्धेस पात्र ठरण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होण्याची शक्‍यता आहे. या लढतीचा अंतिम ड्रॉ उद्या (ता. 9) ठरणार आहे, पण ड्रॉ साठीच्या मानांकनानुसार भारत-पाक लढतीची शक्‍यता आहे.

पुरुषांच्या स्पर्धेसाठी भारतीय संघाचा अव्वल असलेल्या गट क्रमांक एकमध्ये समावेश आहे, तर पाकिस्तानचा समावेश सर्वात तळाच्या गट क्रमांक चारमध्ये आहे. गट क्रमांक एकमध्ये भारतासह नेदरलॅंडस्‌ आणि जर्मनी आहेत. हे संघ लढत मायदेशात खेळतील, तर त्यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी पाकिस्तान, ऑस्ट्रिया, रशिया यापैकी एक असतील. त्यामुळे ड्रॉनुसार भारत-पाक लढत ठरल्यास ती भारतात (बहुदा भुवनेश्‍वर) होईल.

महिलांच्या स्पर्धेसाठी भारतीय संघ गट क्रमांक दोनमध्ये आहे. त्यात स्पेन, आयर्लंड आणि चीन आहेत. ही आपली लढत मायदेशी खेळतील. त्यांचे प्रतिस्पर्धी कोरिया, बेल्जियम, अमेरिका आणि कॅनडा यापैकी असतील.

ऑलिंपिक पात्रतेसाठी पुरुष, तसेच महिला विभागात प्रत्येकी 14 संघ आहेत. त्यांच्यातील सात विजयी संघ ऑलिंपिकसाठी पात्र ठरतील. या लढतींसाठी 25 ते 27 ऑक्‍टोबर आणि 1 ते 3 नोव्हेंबर कालावधी यापूर्वीच ठरला आहे.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Pakistan may face each other in Olympic hockey qualification