INDvsAUS : ३२ वर्ष अजिंक्य ऑस्ट्रेलियाची मस्ती जिरवली; भारतानं चौथ्यांदा केलाय असा पराक्रम

टीम ई-सकाळ
Tuesday, 19 January 2021

राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहली होती.

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी ३२८ धावांचं टार्गेट दिल्यानंतरही त्यांना पराभव स्वीकारावा लागेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पाचव्या दिवशी खेळाला सुरवात झाली अन् भारताला सुरवातीलाच धक्के बसले. तरीही शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी चिवट फलंदाजी करत विजय खेचून आणला. आणि गाबा स्टेडियमवर ३ विकेट राखत ऐतिहासिक विजय नोंदवला. 

या मैदानावर ३२ वर्षात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला पराभवाला सामोरं जावं लागेल. या मैदानावर ऑस्ट्रेलिया संघ अजिंक्य होता. त्यांना १९८८ मध्ये वेस्ट इंडिजने पराभूत केलं होतं. त्यानंतर यजमान टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभवाची चव चाखायला लावली. ऑस्ट्रेलियाचा विजयी रथ रोखण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही टीम इंडियाने असा पराक्रम करून दाखवला आहे. 

बीसीसीआयनं मालामाल केल्यावर आयसीसीनंही केला टीम इंडियाचा सन्मान​

२००१ मध्ये वॉच्या संघाचा केला होता पराभव 
२००१ मध्ये कोलकाता येथे पहिल्यांदा असा चमत्कार घडला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने सलग १६ कसोटी सामने जिंकले होते आणि ही विजयी मालिका पुढेही कायम ठेवेल असा त्यांचा संघ मजबूत होता. त्यावेळी ईडन गार्डन स्टेडियमवर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवत त्यांची नेत्रदीपक विजयाची नोंद केली होती. 

सावधान इंडिया! आनंदानं हुरळून जाऊ नका; इंग्लंडच्या दिग्गजाचा इशारा​

द्रविड, लक्ष्मण आणि भज्जी ठरले हीरो
राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहली होती. आणि फॉलोऑन टाळल्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले होते. त्यावेळी भज्जीने बॉलिंगमध्ये करिष्मा करत घेतलेली हॅट्ट्रिक कशी विसरली जाईल. 

२००८ मध्ये वाकावर दुसऱ्यांदा रोखलं
२००८मध्ये वाका येथे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा विजयी रथ दुसऱ्यांदा रोखला. आशियाई संघांविरुद्ध कांगारुंची विजयी मालिका सुरू होती. अनिल कुंबळेंच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाला ७२ रन्सनी पराभूत केलं होतं. आणि त्याचबरोबर भारत ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा पहिला आशियाई संघ ठरला होता.  

फिनिक्सची अजिंक्य भरारी​

२०१६ मध्ये सिडनीत धमाका
२०१६मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला ६ विकेटने हरवत नवा इतिहास घडवला होता. घरच्या मैदानावर सलग १९ विजय मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाची घोडदौड भारताने रोखली. त्यानंतर गाबा मैदानावरही गेल्या ३२ वर्षांपासून ऑस्ट्रेलियाने कधी पराभव पाहिला नव्हता. पण पुन्हा एकदा टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाची घमेंड उतरवली. 

- क्रीडा क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India tour of Australia team India break Australia 32 year long invincible streak at Gabba