IND vs AUS : अक्षर पाया अन् अश्विनचा कळस; दोघांच्या शतकी भागीदारीने भारताला सावरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashwin

IND vs AUS : अक्षर पाया अन् अश्विनचा कळस; दोघांच्या शतकी भागीदारीने भारताला सावरले

Ind vs Aus Test Ravichandran Ashwin : दिल्ली कसोटीतील खेळपट्टीने भारतीय गोलंदाजांना पहिल्या दिवशी खूश केले. त्याच खेळपट्टीने दुसऱ्‍या दिवशी भारतीय फलंदाजांना चांगलेच रडविले. नॅथन लायनच्या फिरकी माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांची भंबेरी उडाली.

मोठ्या पिछाडीचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसत असताना अक्षर पटेल आणि आर. अश्विन मदतीला धावले. त्यांच्या शतकी भागीदारीमुळे भारत एका धावेनेच पाठीमागे राहिला.

ऑस्ट्रेलियाच्या २६३ धावांना प्रत्युत्तर देताना भारताची ७ बाद १३९ अशी अवस्था झाली होती. तेव्हा अजून १२४ धावांची गरज होती. पाय खोलात जात असताना अक्षरनने ७४; तर अश्विनने ३७ धावांची प्रतिकार करून आठव्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली.

ऑस्ट्रेलियाचे आक्रमण :

मोठ्या धावांच्या संभाव्य पिछाडीतून सुटका झाल्याचे भारतीयांचे समाधान फार काळ टिकले नाही. कारण दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना झालेल्या १२ षटकांत ट्रॅव्हिस हेड (४० चेंडूत ३९) आणि लाबुशेन (१९ चेंडूत १६) यांनी पाच धावांच्या सरासरीने १ बाद ६१ धावा केल्या.

भारताची घसरगुंडी :

आज सकाळी जवळपास पाऊण तास रोहित शर्मा - के. एल. राहुल जोडीने तग धरल्यावर पहिला धक्का लागला. नॅथन लायनने राऊंड द विकेट मारा करून परिणाम साधला. पहिल्यांदा त्याने राहुलला पायचित केले.

१०० वा कसोटी सामना खेळणाऱ्‍या चेतेश्वर पुजाराची तीच गत झाली. कर्णधार रोहित शर्मा लायनचा चेंडू वळेल, या अंदाजाने खेळताना चुकला. कारण चेंडू टप्पा पडल्यावर सरळ गेला आणि यष्टींवर आदळला.

चांगला खेळू लागलेल्या श्रेयस अय्यरने मारलेला फटका फलंदाजाजवळ उभ्या असलेल्या हँडस्कोंबच्या डाव्या हाताला लागून पायरीवरून चेंडू घसरत जावा, तसा त्याच्या पायावरून घसरत खाली आला.

सतर्क हँडस्कोंबने चेंडूवरची नजर कायम ठेवल्याने कठीण झेल त्याला बरोबर पकडता आला. सलग ४ फलंदाजांना बाद करून नॅथन लायनने कमाल केली. ४ बाद ६६ धावसंख्येवरून विराट कोहली रवींद्र जडेजा जोडीने कोलमडू बघणाऱ्‍या धावफलकाची डागडुजी चालू केली.

मोठ्या धीराने फलंदाजी करत दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. टेड मर्फीने रवींद्र जडेजाला पायचित करून अडसर दूर केला.

विराटच्या निर्णयावरून वाद :

अर्धशतकाच्या जवळ असलेला विराट कोहली कुहनेमनला पायचित झाला. पंचांचा निर्णय सगळ्यांना पटला नाही. केवळ तिसऱ्‍या पंचांना ठणठणीत पुरावा सापडला नाही म्हणून मैदानावरील पंचांचा निर्णय बदलला गेला नाही.

अक्षर पटेल आणि अश्विन यांनी धिराने फलंदाजी करत शतकी भागीदारी केली तेव्हा भारताला आघाडी मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती; परंतु ८० षटकांचा खेळ झाल्यावर कमिन्सने उपलब्ध असलेला नवा चेंडू घेतला आणि लगेचच त्याने अश्विनला बाद केले व पुढच्या षटकांत त्याने अक्षरचा अप्रतिम झेल घेतला.