esakal | आयपीएलचा हत्ती घरामध्ये शिरला; माजी कर्णधार नासीर हुसेनचा थयथयाट
sakal

बोलून बातमी शोधा

आयपीएलचा हत्ती घरामध्ये शिरला; माजी कर्णधार नासीर हुसेनचा थयथयाट

आयपीएलचा हत्ती घरामध्ये शिरला; माजी कर्णधार नासीर हुसेनचा थयथयाट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मँचेस्टर : इंग्लंडचा माजी कर्णधार आणि सध्या समोलोचक असलेल्या नासिर हुसेनने भारत आणि इंग्लंड यांच्यातील रद्द झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी भरगच्च कार्यक्रमाला दोषी धरताना आयपीएलवर निशाणा साधला. आयपीएल नावाचा हत्ती घरामध्ये घुसला आहे आणि त्याच्यामुळे भरगच्च कार्यक्रमाचा हा सर्व गोंधळ झालेला आहे, असा आयपीएलच्या नावाने थयथयाट केला.

हा पाचवा कसोटी सामना होण्यासाठी इंग्लंड क्रिकेट मंडळाकडून बीसीसीआयशी संपर्क साधून प्रयत्न केले जात होते; परंतु बीसीसीआयने त्यावर मार्ग काढला नाही. भारतीय खेळाडूंनीही खेळण्यास नकार दिला, असा आरोप हुसेन यांनी केला आहे. सामन्याच्या आदल्या दिवशी भारतीय खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असली, तरी एक-दोन दिवसांत काही खेळाडूंना लक्षणे दिसू शकतील, असे विराट कोहलीचे म्हणणे असल्याचे वृत्त ब्रिटिश माध्यमांत प्रसिद्ध केले जात आहे; पण माजी खेळाडू आणि बीबीसीचे क्रिकेट पत्रकार जोनाथन अॅग्न्यू यांनीही थेट आयपीएलला जबाबदार धरले. अपूर्ण राहिलेली आयपीएल पूर्ण करण्याची भारतीय खेळाडूंना घाई लागली होती, म्हणून त्यांनी हा पाचवा कसोटी सामना खेळण्यास नकार दिला, असा आरोप अॅग्न्यू यांनी केला आहे.

‘डेली मेल’मधील आपल्या स्तंभलेखात हुसेन म्हणतात, सामना रद्द झाल्यामुळे प्रेक्षकांना तिकिटांचे पैसे परत मिळतील; परंतु खेळाचा थरार आणि रोमांच याचा मोबदला त्यांना कसा मिळणार. काही जण मँचेस्टर शहराच्या बाहेरून या सामन्यासाठी आले होते, त्यांचा प्रवास तसेच आगाऊ रक्कम देऊन बुकिंग केलेला निवासाचा खर्च कोण देणार? ही पूर्णपणे गोंधळाची परिस्थिती आहे आणि त्याला भरगच्च कार्यक्रम तसेच आयपीएल कारणीभूत असल्याचा पुनरुच्चार करून हुसेन यांनी भारतीयांना हा सामना खेळायचाच नसल्याचा आरोप केलाय. आयपीएल कोणत्याही परिस्थितीत बीसीसीआयला खेळवायची आहे. पाचव्या कसोटीचे त्यांना महत्त्व नव्हते, असे हुसेन वारंवार म्हणत आहेत.

loading image
go to top