ट्वेन्टी-२० मध्ये राहुल-रोहित पर्वाची सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्वेन्टी-२०मध्ये राहुल-रोहित पर्व
न्यूझीलंडविरुद्धची मालिका; नवोदित खेळाडूंवर लक्ष #RahulDravid #RohitSharma #sakalNews

ट्वेन्टी-२० मध्ये राहुल-रोहित पर्वाची सुरुवात

जयपूर : आखातातील ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपयशाची मरगळ झकटून भारतीय क्रिकेट एक नवी सुरुवात करत आहे आणि त्यासाठी राहुल द्रविड-रोहित शर्मा यांचे नवे पर्व सुरू होत आहे. न्यूझीलंडविरुद्ध उद्या पहिला ट्वेन्टी-२० सामना होत आहे आणि राहुल-रोहित ही जोडी ट्वेन्टी-२० प्रकारात भारताचे भवितव्य घडविण्यास सज्ज झाली आहे.

पुढचा विश्वकरंडक नऊ महिन्यांनंतर ऑस्ट्रेलियात होत आहे आणि त्यादृष्टीने संघ बांधणीबरोबर विचारसरणीचीही बदलाची प्रक्रिया न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून सुरू होणार आहे. आखातातील विश्वकरंडक स्पर्धेत साखळीतच पराभूत होण्याची नामुष्की आल्यानंतर भारतीय संघ नव्या वळणावर आला आहे. रवी शास्त्री यांचे पर्व संपत असताना विराट कोहलीने ट्वेन्टी-२० क्रिकेटचे कर्णधारपद सोडले आहे. तसेच आता न्यूझीलंडविरुद्ध आयपीएल गाजविलेल्या आणि ताज्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. वेंकटेश अय्यर, ऋतुराज गायकवाड, अक्षर पटेल आणि आवेश खान या खेळाडूंनी आयपीएल गाजवली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत या खेळाडूंवर लक्ष असेल. पुढच्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेची तयारी या ताज्या दमाच्या खेळाडूंपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

तीन दिवसांत न्यूझीलंड मैदानात

न्यूझीलंडसाठी ही मालिका कठीण असणार आहे. दुबईमधील ट्वेन्टी-२० विश्वकरंडकाचा अंतिम सामना खेळल्यानंतर अवघ्या ७२ तासांत त्यांना भारतात सामना खेळावा लागणार आहे. रविवारपर्यंत ही मालिका संपणार आहे. आठवड्यात त्यांच्यासमोर तीन सामने खेळण्याचे आव्हान आहे.

सलामीला कोण?

भारतीय संघात आता कर्णधार रोहित, केएल राहुल आणि आयपीएलमध्ये अधूनमधून सलामीला खेळलेला ऋतुराज गायकवाड तसेच वेंकटेश अय्यर असे सलामीवीर आहेत. उद्याच्या पहिल्या सामन्यासाठी रोहित आणि राहुलचा सलामीला खेळतील असा अंदाज आहे.

राहुल-रोहितची जोडी

२००७ मध्ये रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले त्या वेळी आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी राहुल द्रविड होते. आता रोहित पूर्णवेळ प्रथमच ट्वेन्टी-२० सामन्याचे कर्णधारपद स्वीकारत असताना राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक आहेत.

सामन्याचे ठिकाण : जयपूर | वेळ : सायंकाळी ७.०० पासून | थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्

loading image
go to top