IND vs WI : अमेरिकेत रंगणार भारत-विंडीज ट्वेन्टी-20 मालिकेचा थरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs WI

IND vs WI : अमेरिकेत रंगणार भारत-विंडीज ट्वेन्टी-20 मालिकेचा थरार

लॉडरहिल : सहा वर्षांपूर्वी फ्लोरिडातील याच मैदानावर वेस्ट इंडीजने भारताचा एका धावेने पराभव करून भारताविरुद्ध कोणत्याही प्रकारातील अखेरची मालिका जिंकली होती. आता याच मैदानावर होणारे दोन सामने जिंकून वेस्ट इंडीजवरचे वर्चस्व कायम राखण्याची भारताला संधी आहे. २०१६ मध्ये भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात दोन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका येथे नियोजित होती. त्यातील पहिल्या सामन्यात विंडीजने तब्बल ६ बाद २४५ धावांचा डोंगर उभारला होता. भारतानेही तोडीस तोड खेळ करत २४४ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर दुसरा सामना पावसामुळे वाया गेला होता आणि मालिका वेस्ट इंडीज संघाच्या खिशात गेली होती.

आता या दोन देशांतील पाचपैकी तीन सामने विंडीजमध्ये झाले आहेत आणि त्यात भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. उरलेले दोन सामने फ्लोरिडात शनिवार आणि रविवारी होणार आहेत. उद्याचा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी भारतासमोर आहे.

लॉडरहिलचे हे मैदान छोटे आहे. सीमारेषा जवळ आहेत. खेळपट्टी कशी असेल हे सांगणे कठीण असले तरी धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. के. एल. राहुल दुखापत व कोरोनाची लागण यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. सूर्यकुमार यादव याने मात्र या दरम्यान टीम इंडियातील आपले स्थान भक्कम केले आहे. आशियाई करंडकासाठी ८ ऑगस्ट रोजी संघ निवड होणार आहे. त्यामुळे त्याआधीच्या दोन लढतींमध्ये भारतीय चमक दाखवण्याची शक्यता आहे.

रोहित शर्माबाबत प्रश्नचिन्ह

तिसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना रोहित शर्माच्या पाठीचा स्नायू दुखावला होता, त्यामुळे त्याला निवृत्त व्हावे लागले होते. तंदुरुस्त होऊ, असा विश्वास त्याने व्यक्त केला असला तरी या महिन्याअखेर होणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी रोहितच्या तंदुरुस्तीबाबत धोका स्वीकारला जाणार नाही. शिवाय संघात इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड असे सलामीवीर आहेत.

Web Title: India West Indies Team Twenty20 Cricket Match In America

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..