टोकियोत भारत करणार सर्वोत्तम कामगिरी; क्रीडा मंत्र्यांचा विश्वास

वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

भारत आगामी टोकियो 2020 ऑलिंपिक स्पर्धेसाठी तगडा संघ पाठवेल आणि त्यांची कामगिरी आजपर्यंतची सर्वोत्तम असेल, असा विश्‍वास केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी गुरुवारी लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात व्यक्त केला. 

नवी दिल्ली : भारत आगामी टोकियो 2020 ऑलिंपिक स्पर्धेसाठी तगडा संघ पाठवेल आणि त्यांची कामगिरी आजपर्यंतची सर्वोत्तम असेल, असा विश्‍वास केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी गुरुवारी लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात व्यक्त केला. 

लोकसभेच प्रश्‍नोत्तराच्या सत्रात बोलताना रिजीजू म्हणाले,"विविध क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे आत्मविश्‍वास उंचावला आहे. अशाच सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाच तगडा संघ आम्ही ऑलिंपिकला पाठवणार आहोत.'' 

भारताला 2016 रियो ऑलिंपिक स्पर्धेत केवळ दोन पदकांवर समाधान मानावे लागले होते. रिजीजू म्हणाले,""गेल्या ऑलिंपिक स्पर्धेतील कामगिरीचे आवलोकन करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यांच्याकडून कामगिरीत सुधारणा करण्यासाठी चांगल्या सूचना आल्या आहेत. त्याचे परिणाम या ऑलिंपिकमध्ये निश्‍चित दिसून येतील. पदकाची खात्री असलेल्या खेळाडूंना ऑलिंपिकसाठी निवडले जाईल.'' 

"क्रीडा प्रसार आणि प्रचार ही राज्य सरकारांची जबाबदारी आहे. राज्यातील क्रीडा विकासात येणारे अडथळे दूर करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे." 
-किरेन रिजीजू, केंद्रिय क्रीडा मंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India will perform best in Tokyo says Sports ministers