INDvsSA : भारताचा फलंदाजीचा निर्णय; उमेश यादव संघात

INDvsSA : भारताचा फलंदाजीचा निर्णय; उमेश यादव संघात

गहुंजे : पावसाचे सावट असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरवात झाली असून, भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात अष्टपैलू हनुमा विहारीऐवजी वेगवान गोलंदाज उमेश यादवला स्थान देण्यात आले आहे.

भारतीय संघाने विशाखापट्टणम येथील पहिला कसोटी सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. विराटने बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले, की आमच्या संघात कोणताही खेळाडू आत्मकेंद्रित नसून, संघासाठी मी काय करू शकतो असाच विचार करून प्रत्येक जण प्रेरित झालेला असतो. हा संघ सबबी पुढे करणारा नसून उत्तरे शोधणारा आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी आजपासून सुरु होत आहे. सामन्याच्या वेगवेगळ्या टप्प्यास खेळाडू पुढाकार घेऊन जबाबदारी पार पाडत आहेत. आम्हाला ताठर दृष्टिकोन ठेवायचा नाही. आम्ही लवचिक राहू आणि आम्हाला याच पद्धतीने प्रगती करायची आहे. संघाने तशा पद्धतीचा अवलंब केला नाही, तर हे शक्‍य होत नाही. आमच्या खेळाडूंनी हेच साध्य केले आहे आणि ते अधिकाधिक योगदान देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे विराट म्हणाला.

त्या पराभवानंतर धडे 
पुण्यातील आधीच्या कसोटीत भारतीय संघ हरला होता. त्या पराभवातून धडे घेतल्याचे सांगून विराट म्हणाला, की तुम्ही काही कसोटी जिंकता, तर काही हरता. मागील वेळी आम्ही येथे खेळलो तेव्हा हरलो. अशा गोष्टी घडत असता, त्यावर मात करून पुढे जायचे असते. आम्हाला तेव्हा हरल्याचा पश्‍चात्ताप नाही. आम्ही त्यातून शिकलोच आहोत आणि त्यानंतर मायदेशात आम्ही एकही कसोटी गमावलेली नाही हे लक्षात घ्या. आम्ही गाफील राहात नाही. मैदानावर उतरून योग्य पद्धतीने खेळण्याचा आमचा प्रयत्न असतो. 

मायदेशात खेळणे आव्हानात्मक 
आता संघात असलेले खेळाडू दर्जेदार आहेत. मायदेशात कसे खेळायचे याची आम्हाला चांगली कल्पना आहे. कसोटी सामने कसे जिंकायचे हे आम्हाला ठाऊक आहे. मायदेशात खेळणे सोपे नसते, कारण चेंडू वळत असतो. पूर्वी आम्हालासुद्धा हे अवघड गेले. आम्ही कुणाला गृहीत धरत नाही. अशाच परिस्थितीत खेळत आम्ही लहानाचे मोठे झालो आहेत. आमच्यासाठी दृष्टिकोन महत्त्वाचा आहे आणि आम्हाला प्रत्येक सामना जिंकायचा असतो. परिस्थिती कशी आहे यावर आम्ही लक्ष केंद्रित करीत नाही.

आता ड्रॉचा उद्देश नाही 
आयसीसीने जागतिक कसोटी स्पर्धा सुरू केल्यापासून भारतीय संघाची ही दुसरी मालिका आहे. गुणपद्धतीबद्दल विराटने सांगितले, की आता प्रत्येक कसोटीचे महत्त्व आणखी वाढले आहे. एरवी तीन कसोटींच्या मालिकेत तुम्ही कदाचित एखादी अनिर्णीत ठेवली असती. आता मात्र संघ विजयासाठी खेळतील आणि जादा गुण मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहतील. हे कसोटी क्रिकेटसाठी चांगले आहे. त्यामुळे कसोटी सामने आणखी रंगतदार होतील, ज्याचा अनुभव आपण यापूर्वीच घेतला आहे. तुम्हाला प्रत्येक सत्रात व्यावसायिकता दाखवावी लागते. त्यादृष्टीने खेळाडूंसमोर हे कडवे आव्हान असते. ही गोष्ट चांगलीच आहे. कारण त्यामुळे कसोटी क्रिकेटचा दर्जा उच्च राहील. 

शमीला सांगावे लागत नाही 
पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात पाच विकेट टिपलेला वेगवान गोलंदाज महंमद शमीचे विराटने कौतुक केले. तो म्हणाला, की मायदेशातील खेळपट्ट्यांवर त्याच्या इतका चेंडू सीम करणारा कुणी गोलंदाज मी पाहिलेला नाही. होय, आंतरराष्ट्रीय पातळीवर बरेच गोलंदाज तसे करतात; पण त्या खेळपट्ट्या अनुकूल असतात. शमीकडे मात्र ठणठणीत खेळपट्टीवरही तशी क्षमता आहे, त्यामुळेच तो आमच्यासाठी इतका महत्त्वाचा गोलंदाज बनला आहे. आम्ही त्याच्या आणि सर्वच वेगवान गोलंदाजांच्या वर्कलोडचे अचूक व्यवस्थापन करतो. अर्थात, शमी असा गोलंदाज आहे, जो काहीही घडत नसताना सामन्याचे पारडे पूर्णपणे फिरवू शकतो, तसे कौशल्य त्याच्या ठायी आहे. आता तो अधिकाधिक जबाबदारी पेलतो आहे. आता ये बाबा आणि एवढा स्पेल टाक आमच्यासाठी, असे त्याला सांगावे लागण्याची गरज नाही. त्याला स्वतःहून चेंडू हवा असतो आणि तो संघाला अपेक्षित कामगिरी फत्ते करून दाखवितो. चेंडू मिळाल्यानंतर त्याला परिस्थितीचे आकलन होते. खास करून दुसऱ्या डावात परिस्थिती खडतर असते तेव्हा तो येतो आणि दरवेळी हवी ती कामगिरी करून दाखवितो. हे ग्रेट आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com