esakal | विराट सेनेला जमले नाही ते लंडनमध्ये अपंग क्रिकेट संघाने करून दाखवले
sakal

बोलून बातमी शोधा

विजेता भारतीय संघ
ज्या लंडनमध्ये विराट सेनेचे विश्‍वकरंडक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले त्या लंडनमध्ये विक्रांत किणी नेतृत्व करत असलेल्या भारताच्या अपंग क्रिकेट संघाने कमाल केली. वर्ल्ड टी-20 सीरिज क्रिकेट स्पर्धेत यजमान इंग्लंडलाच हरवून विजेतेपदाचा मान मिळवला. भारताने हा सामना 36 धावांनी जिंकला.

विराट सेनेला जमले नाही ते लंडनमध्ये अपंग क्रिकेट संघाने करून दाखवले

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन : ज्या लंडनमध्ये विराट सेनेचे विश्‍वकरंडक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले त्या लंडनमध्ये विक्रांत किणी नेतृत्व करत असलेल्या भारताच्या अपंग क्रिकेट संघाने कमाल केली. वर्ल्ड टी-20 सीरिज क्रिकेट स्पर्धेत यजमान इंग्लंडलाच हरवून विजेतेपदाचा मान मिळवला. भारताने हा सामना 36 धावांनी जिंकला.

ब्लॅकफिन्च येथे झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 बाद 180 धावा केल्या. मधल्या फळीतील फलंदाज रवींद्र सांतेने सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. त्याने या धावा 34 चेंडूत दोन चौकार आणि चार षटकारांसह झळकावल्या. त्याअगोदर सलामीवीर कुणाल फणसे (36) आणि कर्णधार विक्रांत किणी (29); तसेच एस. महेंद्रन यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

भक्कम धावसंख्या उभारल्यानंतर भारतीयांनी इंग्लंडला 20 षटकांत 9 बाद 144 धावांत रोखले आणि या पहिल्यावहिल्या वर्ल्ड टी-20 सीरिज स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. फणसेने गोलंदाजीतही उत्तम कामगिरी करताना दोन विकेट मिळवल्या. सनी गोयतनेही दोन विकेटचा हातभार लावला.

इंग्लंडने अँगस ब्राऊनच्या 44 धावांच्या खेळीच्या जोरावर 11 षटकांत 1 बाद 90 अशी सुरुवात केली होती; परंतु त्यानंतर कुणाल फणसे आणि सनी गोयतने एका मागोमाग एक धक्के देत भारताचा विजय सुकर केला.

बीसीसीआयकडून केवळ अभिनंदन
बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट मंडळ) या स्पर्धेसाठी आपल्या संघाला मान्यता दिली; परंतु कोणतेही आर्थिक साह्य दिले नाही. विजेतेपद मिळवल्यानंतर बीसीसीआयने बऱ्याच वेळेनंतर ट्विटरवरून अभिनंदन करण्याची औपचारिकता पूर्ण केली. मुंबई रणजी संघाचे माजी खेळाडू आणि माजी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी या अपंग संघाचे प्रशिक्षक होते.

संक्षिप्त धावफलक ः भारत 20 षटकांत 7 बाद 180 (रवींद्र सांते 53, कुणाल फणसे 36, विक्रांत किणी 29, एलएम ओब्रायन 2-35) वि. वि. इंग्लंड 20 षटकांत 9 बाद 144 (अँगस ब्राऊन 44, सी. फ्लेन 28, कुणाल फणसे 2-15)

loading image