आजच्या पिढीच्या यशात अनुभवणार माझा आनंद

परमजित सिंग
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघ आता नवा विचार करत आहे. आशियाई स्पर्धेपूर्वी आपल्या खेळाडूंना परदेशातील स्पर्धेत सहभागाची संधी मिळत आहे. सरावासाठी त्यांना परदेशात जाण्याची मुभा मिळते. यावेळचा संघ बघता महंमद अनस आणि आरोक्‍य राजीव या दोघांनी चारशे मीटर शर्यतीत पदके जिंकायलाच हवीत. अनसला कतारी धावपटूंचे आव्हान असेल, तरी त्याचा सध्याचा फॉर्म विसरता येणार नाही. या दोघांच्या जोडीला धारुण आणि कुन्हू महंमद असे चारही धावपटू ४६ सेकंदांच्या आत धावणारे असल्यामुळे रिले शर्यतीत मला सुवर्णपदक अपेक्षित आहे. नीरज चोप्राला सर्वाधिक संधी आहे. त्याला सध्या आशियात आव्हान नाही अशी वेळ आहे.

भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघ आता नवा विचार करत आहे. आशियाई स्पर्धेपूर्वी आपल्या खेळाडूंना परदेशातील स्पर्धेत सहभागाची संधी मिळत आहे. सरावासाठी त्यांना परदेशात जाण्याची मुभा मिळते. यावेळचा संघ बघता महंमद अनस आणि आरोक्‍य राजीव या दोघांनी चारशे मीटर शर्यतीत पदके जिंकायलाच हवीत. अनसला कतारी धावपटूंचे आव्हान असेल, तरी त्याचा सध्याचा फॉर्म विसरता येणार नाही. या दोघांच्या जोडीला धारुण आणि कुन्हू महंमद असे चारही धावपटू ४६ सेकंदांच्या आत धावणारे असल्यामुळे रिले शर्यतीत मला सुवर्णपदक अपेक्षित आहे. नीरज चोप्राला सर्वाधिक संधी आहे. त्याला सध्या आशियात आव्हान नाही अशी वेळ आहे. व्हिएतनामचा जागतिक विद्यापीठ विजेता चाओ सुन चेंग हाच काय तो नीरजला आव्हान देऊ शकेल. इतर खेळाडूंत तेजिंदर तूर (गोळाफेक), अरपिंदर सिंग (तिहेरी उडी), धारुण व संतोष कुमार (चारशे हर्डल्स), लांब उडीत श्रीशंकर यांच्याकडूनही पदकांची अपेक्षा अधिक आहे. या खेळाडूंचा पदकाचा आनंद बघताना मी नक्कीच माझ्या आठवणीत रमेन.

राष्ट्रीय स्पर्धेत धावायला सुरवात केल्यानंतर पाच वर्षांनी १९९८ मध्ये मिल्खा सिंग यांचा ४०० मीटर शर्यतीमधील ३८ वर्षे जुना विक्रम मोडला. साहजिकच आत्मविश्‍वास उंचावला होता; पण आव्हानाची कल्पना होती. तरी बॅंकॉक आशियाई स्पर्धेत माझ्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा बाळगली जात होती. श्रीलंकेचा सुगत तिलकरत्ने, कतारचा इब्राहिम इस्माईल यांच्या आव्हानासमोर ते सोपे नव्हते. सुवर्ण नाही, पण पदक जिंकणार, याचा मला आत्मविश्‍वास होता. पदक जिंकायचेच होते, कारण राष्ट्रीय विक्रम ‘फ्ल्युक’ नव्हता हे मला सिद्ध करायचे होते. पदकाच्या ईर्ष्येनेच धावलो. त्यामुळे ब्राँझपदकापर्यंत पोचलो. मी पदक जिंकले खरे; पण लिजो डेव्हिड, रामचंद्रन, जटाशंकर यांची मोलाची साथ मला मिळाली. त्यांच्यामुळेच मला वेगाने धावण्याची प्रेरणा मिळाली. आम्ही चौघे एकत्र आल्यावर रिले शर्यत आमचीच, असा विश्‍वास आम्हाला होता. पण, सुवर्ण थोडक्‍यात हुकले. अर्थात, रौप्यपदकाला राष्ट्रीय विक्रमाची झालर मिळाली, त्यामुळे आमचा आनंद द्विगुणीत झाला. आता या आठवणी झाल्या. आजच्या खेळाडूंच्या यशात मी आता हा आनंद अनुभवत आहे. शेवटी पुढची पिढी, एक पाऊल पुढे असणारच.

शब्दांकन - नरेश शेळके


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Athletics Federation