
वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात आज (रविवार) तिसऱ्या दिवशी व्हायला नको तेच झाले. प्रमुख फलंदाजांना बाद करून सामन्यात पुनरागमन करायचा भारतीय संघाचा प्रयत्न न्यूझीलंडच्या अष्टपैलू खेळाडूंनी हाणून पाडला. 7 बाद 225 धावसंख्येवरून न्यूझीलंडचा डाव तब्बल 348 धावांवर संपला. 183 धावांची भक्कम आघाडी न्यूझीलंड संघाच्या हाती लागली. दुसर्या डावात भारतीय फलंदाजांनी बर्यापैकी फलंदाजी करूनही तिसर्या दिवस अखेरीला चार फलंदाजांना बाद करण्यात न्यूझीलंडला यश आले होते. न्यूझीलंडला परत फलंदाजी करायला लावायला भारतीय संघाला अजून 39 धावा कमीतकमी कराव्या लागणार आहेत. थोडक्यात सांगायचे तर यजमान संघ पहिला कसोटी सामना जिंकण्याच्या मार्गावर चालू लागला आहे. पराभव टाळायचा झाल्यास अंगाबाहेरची कामगिरी उरलेल्या फलंदाजांना करून दाखवावी लागणार एाहे.
दोन दिवस चांगले हवामान वेलिंग्टन शहरावर नांदत होते. शनिवारी रात्री हवामान बदलले. रात्रभर रिमझिम पाऊस चालू राहिला. सकाळी सूर्य महाराज मैदानावर क्रिकेट बघायला आले तरी दक्षिण दिशेकडून गारेगार वारा दिवसभर वाहत राहिला. तिसर्या दिवसाची सुरुवात सकारात्मक झाली जेव्हा बुमराने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर चिवट वॉटलींगला बाद केले. टीम साउदीही जास्तकाळ टिकू शकला नाही. 7बाद 225 धावसंख्येवर भारतीय कर्णधार विराट कोहली आघाडी कमीत कमी राखायची स्वप्न बघू लागला होता. कागदावर गोलंदाज म्हणून संघात असलेल्या न्यूझीलंडच्या तळातील खेळाडूंनी नंतर सामना सुंदर फलंदाजी करून खेचून आणला.
कॉलिन डी ग्रँडहोम - कायल जेमीसनने चांगली भागीदारी रचली ज्यात जेमीसनने 4 षटकारांसह आक्रमक 44 धावा केल्या. कॉलिन ग्रँडहोमने 43 धावा करून बाद झाल्यावर डाव संपवण्याचे विचार परत घोळू लागले. त्याच वेळी बॅटीचा दांडपट्ट्यासारखा वापर करून ट्रेंट बोल्टने 5 चौकार 1 षटकार मारून 38 धावा केल्या ज्या भारतीय संघाला चांगल्याच सतावून गेल्या. अखेर आपटबार टाकून ईशांत शर्माने ट्रेंट बोल्टला बाद केले जो त्याचा 5वा बळी ठरला. 183 धावांची मजबूत आघाडी न्युझिलंडच्या हाती आली ती केवळ अष्टपैलू खेळाडूंनी दिलेल्या योगदानामुळेच. बाकीच्या भारतीय गोलंदाजांना बर्यापैकी मार पडला असताना ईशांत शर्माने अथक गोलंदाजी करून 22 षटकात 68 धावा देत 5 फलंदाजांना बाद केले.
सामना वाचवायची भारतीय संघाची धडपड चालू झाल्यावर पृथ्वी शॉ पहिल्या डावाप्रमाणेच दुसर्या डावातही चमक दाखवून बाद झाला. मग फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पुजाराने संयमी फलंदाजीचे दर्शन 81 चेंडूत 11 धावा करून दिले. समंजस फलंदाजी करत होता मयांक आगरवाल. सलग दुसर्या डावात चांगली फलंदाजी करताना मयांक आगरवालने अर्धशतकी मजल मारली आणि साउदीच्या लेग स्टंप बाहेरच्या अत्यंत साध्या चेंडूवर तो बाद झाला. तीच गत सध्या फॉर्मात नसलेल्या विराट कोहलीची झाली. जम बसला आहे वाटत असताना ट्रेंट बोल्टला त्याने उगाच विकेट बहाल केली. मग फक्त तिसर्या दिवशीच्या खेळात टिकून राहण्याची धडपड अजिंक्य रहाणे - हनुमा विहारीने केली तेव्हा धावफलक 4 बाद 144 चे चित्रं दाखवत होता.
जास्त पुढे बघून चालणार नाही : अश्विन
गोलंदाज म्हणून आम्ही मिळून सगळे प्रयत्न केले. त्यांच्या अष्टपैलू खेळाडूंनी खूपच मस्त फलंदाजी केली. म्हणूनच मला वाटते की त्यांना श्रेय द्यायला हवे. न्युझिलंड संघाला स्थानिक परिस्थितीचा चांगला अंदाज होता त्याचा फायदा त्यांनी बरोबर उचलला आहे. आमच्यापेक्षा सरस खेळ त्यांनी तीन दिवस करून दाखवला आहे. सामना अशा अवस्थेत आहे की आम्हांला जास्त पुढे बघून चालणार नाही. चौथ्या दिवशी खेळ चालू झाल्यावर आम्हांला प्रत्येक क्षणाला जागरूक राहून फलंदाजी करावी लागेल. एक एक तास आणि एक एक सत्र खेळायची योजना आखून नव्हे तर राबवावी लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.