भारतीय गोलंदाजांनो आगोदर ग्राऊंडबद्दल जाणून घ्या; प्रशिक्षकांचे मत

cricket
cricket

ऑकलंड : न्यूझीलंडचा दौरा चालू झाल्यावर 15 दिवसांनंतर भारतीय संघाला पराभवाची कडू चव चाखायला मिळाली. हॅमिल्टन सामना यजमान संघाने जिंकल्याने तीन सामन्यांच्या मालिकेत चुरस निर्माण झाली आहे. टी-20 मालिका जिंकवण्यात गोलंदाजांचा हात होता. तसेच पहिल्या एक दिवसीय सामन्यात भारतीय संघाच्या पराभवात गोलंदाजांचा हात होता.

भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सामन्यात अपेक्षित गोलंदाजी केली नाही. 19 वाईड चेंडू भारतीय गोलंदाजांनी टाकले ज्याच्यावरून संघात पहिल्या सामन्यानंतर चर्चा झाली. भारतीय संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांना भेटलो असताना त्यांनी मुद्दा मांडला की, ‘न्यूझीलंडमधे खेळताना गोलंदाजांना भूमिती समजणे गरजेचे आहे’.

भरत अरुण यांनी पहिल्या एक दिवसीय सामन्याबद्दल बोलताना महत्त्वाचे मुद्दे मांडले. ‘‘हॅमिल्टनच्या सेडन पार्क मैदानावरची सीमारेषा गोल असली तरी जवळ आहे. सामना खेळवला जात असताना जर अचूक मधली खेळपट्टी वापरली गेली तर दोनही बाजूंना समान अंतर राहते. जर खेळपट्टी किंचित हलवली तर मग गोलंदाजांच्या समस्या वाढतात कारण एका बाजूची सीमारेषा खूप जवळ होते. गोलंदाजाचा टप्पा किंवा दिशा थोडी चुकली तरी फलंदाज जवळची सीमारेषा सहजी पार करून 6 धावा खात्यात भसकन जमा करतात. भारताची फलंदाजी चालू असताना अशा जमा होणार्‍या 6 धावा गुदगुल्या करत असल्या तरी आपली गोलंदाजी चालू  झाली की त्याचा तोटा चांगलाच जाणवतो’’, भरत अरुण म्हणाले.

भरत अरुण भारतीय संघाचा सराव करताना गोलंदाजांना अचानक सीमारेषेजवळ नेऊन काही तरी समजावताना दिसले होते. ‘‘मी गोलंदाजांना सीमारेषेजवळ नेतो ते याच कारणासाठी की त्यांना मैदानाची भूमिती समजावी. कुठे सीमारेषा जवळ आहे कुठे लांब आहे हे मनात पक्के बसणे गरजेचे आहे. मग प्रयत्न हा करावा लागतो की असा मारा करायचा ज्याने फलंदाजाला मैदानाच्या सर्वात लांब सीमारेषेकडे फटके मारावे लागावेत. न्यूझीलंडमधील बरीचशी मैदाने छोट्या सीमारेषेची आहेत. पण ऑकलंडचे ईडन पार्क फारच विचित्र आहे. इथे व्यूहरचना लावताना कस लागतो. कॉम्प्यूटर विश्लेषकासोबत सगळ्याचा अभ्यास करून योजना आखणे इथपर्यंत आमचे काम असते मग सामन्यात त्याचे प्रतिबिंब मैदानावर उमटवणे संपूर्णपणे खेळाडूंच्या हाती असते’’, भरत अरुण समजावून देताना सांगत होते.

हॅमिल्टन सामन्यातील पराभवाने भारतीय संघाला कंबर कसून चांगला खेळ करायचे प्रोत्साहन लाभले आहे. यजमान न्यूझीलंड संघ कमजोर नक्कीच नाही. त्यांना पराभूत करायचे झाले तर संपूर्ण सामन्यात कसदार खेळ करणे हाच एकमेव उपाय आहे. ऑकलंडला होणार्‍या दुसर्‍या सामन्याचे महत्त्व त्याच अर्थाने वाढले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com