INDvsNZ : विराट म्हणतो, बदला या शब्दाला थारा नाही

सुनंदन लेले
Thursday, 23 January 2020

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी मैदानावर हजेरी लावत जोरदार सराव केला. सरावादरम्यान दिसून आले, की पहिल्या टी20 सामन्यात रोहित शर्मा सोबत केएल राहुल सलामीला यायची शक्यता आहे. त्याच बरोबर रिषभ पंतला अंतिम 11 जणांच्या संघात जागा मिळेल याची शाश्वती वाटत नाही.

ऑकलंड : भारतीय संघाच्या न्युझीलंड दौर्‍याला शुक्रवार पासून सुरुवात होत आहे. शुक्रवारी पहिला टी20 सामना ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर रंगणार आहे. दोन संघ वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान एकमेकांना भिडले होते त्यानंतर हा सामना होत असल्याने एक छोटी का होईना किनार या सामन्यांना राहणार आहे. कारण न्युझीलंड संघाने भारतीय संघाला वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात पराभूत केले होते. तरीही दोन्ही संघात अनावश्यक खुन्नस दिसत नाही की भारतीय संघाच्या मनात बदला शब्दाला जागा दिसत नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी मैदानावर हजेरी लावत जोरदार सराव केला. सरावादरम्यान दिसून आले, की पहिल्या टी20 सामन्यात रोहित शर्मा सोबत केएल राहुल सलामीला यायची शक्यता आहे. त्याच बरोबर रिषभ पंतला अंतिम 11 जणांच्या संघात जागा मिळेल याची शाश्वती वाटत नाही.

ईडन पार्कचे मैदान जास्त करून रग्बी सामन्यांकरता वापरले जाते. मैदान सुंदर दिसत असले तरी गोलंदाज आणि विकेट किपर मागची सीमारेषा खूपच छोटी असल्याचे दिसते. ‘‘या मैदानावर सामना खेळताना मला गोलंदाजांशी संवाद सतत ठेवावा लागतो कारण या मैदानाची सीमारेषा विचित्र असल्याने बाउंन्सरचा वापर करून चालत नाही. आपटलेल्या चेंडूवर फटका मारताना फलंदाज चुकला तरी चेंडू प्रेक्षकात जाऊन पडू शकतो’’, ‘सकाळ’शी बोलताना कप्तान विराट कोहली म्हणाला.

घरच्या मैदानावर न्यूझीलंड संघाला हरवणे कठीण जाते हे सर्व पाहुण्या संघांना कळून चुकले आहे. भारतीय संघाचा सध्याचा जोष बघता न्यूझीलंड संघ घरच्या मैदानावर सहजी यशस्वी होईल असे वाटत नाही. भारतीय संघातून जसप्रीत बुमरा, नवदीप सैनी सोबत महंमद शमी वेगवान मारा करत आहेत. एकमेव फिरकी गोलंदाजाची जागा कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलला आलटून पालटून दिली जाईल असे वाटते.

न्यूझीलंड संघाची ताकद त्यांच्या अष्टपैलू खेळाडूंच्यात आहे. मिचेल सँटनरपासून ते ग्रॅॅथोमपर्यंत खेळाडू गोलंदाजी बरोबर तगडी आक्रमक फटकेबाजीही करू शकतात. भारत न्यूझीलंड संघ एकमेकांना शेवटचे भिडले होते ते मँचेस्टरला झालेल्या वर्ल्डकप उपांत्य सामन्यात. करोडो भारतीय चाहत्यांचे स्वप्न भंग करणारा तो सामना होता ज्यात न्यूझीलंड संघाने सरस खेळ करून भारतीय संघावर विजय मिळवला होता. ‘‘खूप काळ लोटला तो सामना होऊन. पण एक नक्की की बदला हा शब्द मनात येत नाही इतके न्यूझीलंड संघातील खेळाडू सभ्य आहेत’’, हसत हसत विराट कोहली म्हणाला. ‘‘मैदानावर आम्ही एकमेकांवर तुटून पडतो पण कोणी सभ्यतेची पायरी ओलांडत नाही. दोनही संघातील खेळाडूंनी एकमेकांबद्दल आदर आहे. गेल्या काही सामन्यात कोणी काय केले याला माझ्यालेखी महत्त्व नाही. सामन्याच्या दिवशी कठीण काळात कोण चांगला खेळ करतो यावर सामन्याची दिशा ठरेल’’, कोहली म्हणाला.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन गेल्या काही सामन्यातील संघाला आलेल्या अपयशाने जरा दडपणाखाली आहे. तीनही क्रिकेट प्रकारात केन विल्यमसनलाच कर्णधारपद दिले जावे का, असा प्रश्न विचारला जायला लागला आहे. ‘‘भारतीय संघ नुसता चांगल्या लयीत नाहीये तर त्यांच्या सर्व खेळाडूंना आयपीएल खेळून भरपूर टी20 अनुभव पाठीशी आहे. अर्थातच भारतीय संघाला पराभूत करायला सर्वोत्तम खेळ करून दाखवावा लागेल’’, विल्यमसन म्हणाला.  भारतातील टीव्हीवर सामना बघणार्‍या प्रेक्षकांच्या वेळेचा विचार करून टी20 सामना स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता चालू केला जाणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian cricket team captain Virat Kohli talked about first T20 against New Zealand