भारतीय क्रिकेट संघाला वेस्ट इंडीजमध्ये धोका

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 August 2019

भारतीय क्रिकेट संघाला वेस्ट इंडीजमध्ये जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा पाकिस्तानातील जिओ टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. या वृत्तानंतर भारतीय संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. भारतीय संघाला विंडीजमध्ये धोका असल्याचा ई-मेल पाकिस्तान क्रिकेट मंडळाला आला असून, त्यांनी तातडीने आयसीसी मार्फत ही माहिती "बीसीसीआय'ला दिली आहे.

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाला वेस्ट इंडीजमध्ये जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा पाकिस्तानातील जिओ टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. या वृत्तानंतर भारतीय संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. भारतीय संघाला विंडीजमध्ये धोका असल्याचा ई-मेल पाकिस्तान क्रिकेट मंडळाला आला असून, त्यांनी तातडीने आयसीसी मार्फत ही माहिती "बीसीसीआय'ला दिली आहे. यानंतर "बीसीसीआय'ने तातडीने केंद्रीय गृहमंत्रालयाला याची माहिती दिली आहे. भारतीय संघाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून, विंडीज क्रिकेट मंडळाने यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची हमी "बीसीसीआय'ला दिली आहे.

विंडीज दौऱ्यावर असताना भारतीय संघाच्या गाडीसोबत एक सुरक्षा वाहन देण्यात येणार आहे. संघ व्यवस्थापक सुनी सुब्रमण्यम यांनी भारतीय खेळाडूंना ही माहिती दिली असून, त्यांना जागरूक राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या भारतीय संघ अँटिगा येथे असून, तेथे सराव सामने खेळत आहे. येथेच पहिला कसोटी सामना 22 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 30 ऑगस्ट रोजी होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian cricket team in danger in West Indies