esakal | 'मालिका विजय सुखावणारा; पण सुधारणा आवश्‍यक'
sakal

बोलून बातमी शोधा

 Indian hockey captain Sreejesh has clarified after the success of New Zealand

आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी विजयी मार्गावरून वाटचाल सुरू होणे आवश्‍यक होते. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत नक्कीच हे साध्य केले; पण खेळात अधिक सुधारणा होण्याची आवश्‍यकता आहे, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. 

'मालिका विजय सुखावणारा; पण सुधारणा आवश्‍यक'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई / बंगळूर - आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी विजयी मार्गावरून वाटचाल सुरू होणे आवश्‍यक होते. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत नक्कीच हे साध्य केले; पण खेळात अधिक सुधारणा होण्याची आवश्‍यकता आहे, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. 

भारताने न्यूझीलंडविरुद्ध बंगळूरला झालेल्या हॉकी मालिकेत 3-0 असे धवल यश मिळवले. भारताने किवींना क्वचितच वर्चस्वाची संधी दिली; पण या मालिकेत पुन्हा भारतीयांना पेनल्टी कॉर्नरचा अपेक्षित फायदा घेता आला नाही. श्रीजेश खरं तर भारतीय खेळात काय सुधारणा होण्याची गरज आहे हे सांगण्यास तयार नव्हता; पण पेनल्टी कॉर्नरचा विषय निघाल्यावर त्याने परखडपणे आपले मत व्यक्त केले. 

या मालिकेतही आपण भरपूर पेनल्टी कॉर्नर मिळवले; पण आपल्याला गोल करण्यात अपयश आले. आपल्याकडे चार सर्वोत्तम ड्रॅग फ्लिकर आहेत, त्यामुळे पेनल्टी कॉर्नरवरील गोलचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. पेनल्टी कॉर्नर घेताना त्यात वैविध्य आणण्याची आता आवश्‍यकता आहे, असे श्रीजेशने सांगितले. 

भारताच्या लढतीच्या वेळी सर्वाधिक आवाज श्रीजेशचा असतो, तो सतत सूचना देत असतो. गोलरक्षक हा मैदानावरील मार्गदर्शक असतो. गोलरक्षकाच्या नजरेच्या टप्प्यात पूर्ण मैदान असते. त्यामुळे खेळाचा आढावाही तो योग्य प्रकारे घेऊ शकतो. बचावाकडे लक्ष देतानाच प्रतिआक्रमण कसे करता येईल, याकडेही लक्ष देतो, असे श्रीजेशने सांगितले. सहकाऱ्यांना सूचना करत राहिले, की खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. प्रत्येक केलेला गोल महत्त्वाचा असतो; तसेच वाचवलेला गोलही. हा गोल वाचवण्यासाठीही गोलरक्षकास योग्य सहकार्य मोलाचे असते, असेही त्याने सांगितले. 

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेच्या सरावात भारतीय संघाने शूटआउटचा सराव आवर्जून केला होता. निर्धारित वेळेत आपण जिंकू शकतो, मग शूटआउटचा विचार हवा कशाला? गोल करण्याकडे आम्ही जास्त लक्ष केंद्रित केले आहे. हे साध्य केले, तर शूटआउटची गरजही भासणार नाही. अर्थात, काय घडेल ते सांगता येत नाही, त्यामुळेच सर्व प्रकारची तयारी आवश्‍यक असते, असेही भारतीय कर्णधाराने सांगितले. 

न्यूझीलंड जागतिक क्रमवारीत अव्वल 10 संघांत आहे. त्यांच्याविरुद्धच्या आव्हानात्मक मालिकेचा नक्कीच आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी फायदा झाला. या मालिकेत आम्ही काही प्रयोग केले; तसेच पेनल्टी कॉर्नरवरही. आता आम्ही आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जास्त चांगल्या प्रकारे तयार आहोत. 
- हरेंदर सिंग, भारतीय हॉकी मार्गदर्शक 

 

loading image
go to top