INDvWI Women : तिने 15 व्या वर्षीच मोडला 'मास्टर ब्लास्टर'चा विक्रम!

वृत्तसंस्था
Sunday, 10 November 2019

या सामन्यात लक्ष्य वेधून घेतलं ते 15 वर्षीय शेफाली वर्मानं. शेफालीने 49 चेंडूत 73 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. ही खेळी करताना तिने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेला एक विक्रम मोडीत काढला.

भारतीय क्रिकेट महिला संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. एकदिवसीय क्रिकेट मालिका जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेची सुरुवातही जोरदार केली आहे. रविवारी झालेल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात भारताच्या महिला टीमने वेस्ट इंडिजवर 84 धावांनी विजय मिळवला. आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 

- भारत-बांगलादेश संघांत आज 'फायनल'

या सामन्यात लक्ष्य वेधून घेतलं ते 15 वर्षीय शेफाली वर्मानं. शेफालीने 49 चेंडूत 73 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. ही खेळी करताना तिने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेला एक विक्रम मोडीत काढला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात अर्धशतक लगावणारी सर्वात कमी वयाची खेळाडू ठरण्याचा विक्रम आता शेफालीच्या नावावर नोंदविला गेला आहे. सचिन 16 वर्ष आणि 213 दिवसांचा असताना त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पहिली अर्धशतकी खेळी साकारली होती. तर शेफाली 15 वर्ष आणि 285 दिवसांची असताना तिनं अर्धशतकी खेळी साकारत सचिन तेंडुलकरचा विक्रम आपल्या नावावर केला.

- तेजस्विनीने साध्य केली ऑलिंपिक पात्रता

पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या शेफाली आणि स्मृती मानधना या भारतीय महिला सलामीवीरांगणांनी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. शेफालीनं 6 चौकार आणि 4 षटकार लगावत 73 धावांची खेळी केली. शेफालीचं हे ट्वेंटी-20 क्रिकेटमधील पहिलं अर्धशतक ठरले. तर स्मृतीने 46 चेंडूंत 11 चौकारांच्या बळावर 67 धावांची अर्धशतकी खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर (21) आणि वेदा कृष्णमूर्ती (नाबाद 15) यांनी धावफलक हलता ठेवला. भारताने वेस्ट इंडिजसमोर 20 षटकांत 4 खेळाडूंच्या मोबदल्यात 185 धावांचे लक्ष्य उभारले. 

- रिषभचा विषय सोडा त्याला मोकळेपणाने खेळू द्या - रोहित

185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिज महिला संघाला 20 षटकांत 9 बाद 101 धावाच करता आल्या. शेमैन कॅम्प्बेल (33 धावा) वगळता विंडीजच्या एकही खेळाडू मोठी खेळी साकारू शकली नाही. शिखा पांडे, राधा यादव, पूनम यादव या भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना प्रत्येकी दोन बळी मिळवले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian opener Shafali Verma is the youngest Indian to smash international fifty