esakal | INDvsNZ : जेमिसनपुढे भारतीय फलंदाजांचे लोटांगण; पृथ्वी, पुजारा, विहारीचे अर्धशतक
sakal

बोलून बातमी शोधा

INDvsNZ : जेमिसनपुढे भारतीय फलंदाजांचे लोटांगण; पृथ्वी, पुजारा, विहारीचे अर्धशतक

कर्णधार विराट कोहलीचा बॅड पॅच या सामन्यातही कायम राहिला. तो अवघ्या 3 धावांवर साउथीचा शिकार ठरला. अजिंक्य रहाणेही 7 धावांवर बाद झाल्याने भारताची 4 बाद 113 अशी अवस्था झाली. अखेर विहारीने पुजाराला साथ देत भारताला 200 पर्यंत नेले. चहापानापूर्वी विहारी बाद झाल्यानंतर भारताचा डाव गडगडला आणि 242 धावांत संपुष्टात आला.

INDvsNZ : जेमिसनपुढे भारतीय फलंदाजांचे लोटांगण; पृथ्वी, पुजारा, विहारीचे अर्धशतक

sakal_logo
By
वृत्तसंस्था

ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाज काईल जेमिसनच्या गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा लोटांगण घेतल्याचे आजपासून (शनिवार) सुरु झालेल्या दुसऱ्या कसोटीत पाहायला मिळाले. भारताचा पहिला डाव 242 धावांत संपुष्टात आला. जेमिसनने पाच बळी मिळविले. भारताकडून पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांनी अर्धशतके झळकाविली.

पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडीवर असलेल्या न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यातही पहिल्याच दिवशी वर्चस्व मिळविले आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. हिरव्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांची भंबेरी उडणार हे निश्चित होते आणि झालेही तसेच. सलामीवीर मयांक अग्रवालला बोल्टने 7 धावांवर पायचीत केले. यानंतर पुजाराने पृथ्वीच्या साथीने डाव सावरला. या दोघांनी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीचा धैर्याने सामना केला. पृथ्वीने अप्रतिम फलंदाजीचे दर्शन करत अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशतकानंतर तो 54 धावांवर जेमिसनचा शिकार ठरला. 

कर्णधार विराट कोहलीचा बॅड पॅच या सामन्यातही कायम राहिला. तो अवघ्या 3 धावांवर साउथीचा शिकार ठरला. अजिंक्य रहाणेही 7 धावांवर बाद झाल्याने भारताची 4 बाद 113 अशी अवस्था झाली. अखेर विहारीने पुजाराला साथ देत भारताला 200 पर्यंत नेले. चहापानापूर्वी विहारी बाद झाल्यानंतर भारताचा डाव गडगडला आणि 242 धावांत संपुष्टात आला.

इथली खेळपट्टी अशीच असते 
हॅगली पार्कची खेळपट्टी बघून गोलंदाज हसू लागले आणि फलंदाजांच्या कपाळावर चिंतेच्या आठ्या दिसू लागल्या. खेळपट्टी तयार करणाऱ्या क्‍युरेटरना, गोलंदाजांनी चांगली वाईनची बाटली तुला दिली का, असे गंमतीने विचारले असता, त्यांनी इथली खेळपट्टी अशीच असते, असे हसत हसत सांगितले. तिचा रंग बघून जाऊ नका, इथे आक्रमक फलंदाज चांगली फटकेबाजी करू शकतात, असे उत्तर दिले.