आयुष्य किती क्षणभंगुर असते हे त्यामुळे कळले : विराट कोहली

सुनंदन लेले
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

भारतीय संघातील प्रत्येक जागेकरता खूप चुरस आहे. सलामीला पृथ्वी शॉ आणि मयांक आगरवाल यायची शक्यता आहे. दरम्यान केदार जाधवला सामना खेळायची संधी कधी दिली जाते याकडेही लक्ष असेल. गेले काही सामन्यात संघात असून सतत बाहेर बसलेल्या कुलदीप यादवला संधी देणे गरजेचे आहे. टी-20 मालिकेत उत्तम कामगिरी करणार्‍या शार्दूल ठाकूरला अंतिम संघात जागा मिळेल असे वाटते.

हॅमिल्टन : कोबी ब्रायंटच्या खेळाचा मी चाहता होतो. सकाळी उठून एनबीए बास्केटबॉलचे सामने मी आवडीने बघितले आहेत. कोबीच्या खेळाचा आस्वाद घेतला आहे. कोबीसारख्या महान खेळाडूला इतक्या लहान वयात असा अपघात व्हावा आणि तो देवाघरी जावा हे सगळेच माझ्याकरता फार क्लेषदायक होते. आयुष्य हे किती क्षणभंगुर असते या विचाराने आम्ही सगळे हादरलो. खेळाडू म्हणून आम्ही सतत सर्वोत्तम कामगिरी करायच्या दडपणाखाली असतो. येणार्‍या सामन्यात कसे खेळायचे काय करायचे यश येणार का अपयश या विचारात गर्क असतो. मग बर्‍याच वेळा खेळ हेच जीवन बनते. आयुष्य जगायला आम्ही विसरतो. मला वाटते खेळ हा जीवनाचा एक छोटा भाग आहे...आयुष्य खूप मोठे आहे. जगताना प्रत्येक क्षणावर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे हे समजून घेतले पाहिजे. तेव्हा, जो भी है बस यही एक पल है’ , हे मनोमन समजून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिकले पाहिजे, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

टी20 मालिकेत 5-0 पराभव पत्करलेला न्यूझीलंडचा संघ भारतीय संघाने उभारलेला क्रिकेटचा चक्रव्यूह भेदणार कसा समजत नाहीये. अगोदरच अनेक समस्या यजमान संघाला भेडसावत असताना केन विल्यमसन खांद्याच्या दुखापतीतून सावरला नसल्याने किमान पहिल्या दोन एक दिवसीय सामन्यांना मुकणार असल्याने न्यूझीलंड संघाच्या अडचणीत भर पडली आहे. भारताचा मर्यादित षटकांचा भरवशाचा फलंदाज रोहित शर्मा पोटरीच्या दुखापतीने उर्वरित दौर्‍यातूनच बाहेर पडला आहे. या पार्श्वभूमीवर 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना हॅमिल्टनच्या सेडन पार्क मैदानावर रंगणार आहे.

‘‘रोहित काय कमाल फलंदाजी करतो आहे याचा विचार करता त्याची दुखापत संघाकरता चांगली बातमी नाहीये. सकारात्मक बात इतकीच की त्याला थोडी विश्रांती मिळेल आणि ज्या कोणा खेळाडूला रोहितची जागी मिळेल त्याच्याकरता ती मोठी संधी असेल. दरम्यान पृथ्वी शॉ नक्कीच सलामीला येईल आणि के एल राहुल पाचव्या क्रमांकावरच फलंदाजी करेल’’, विराट कोहली सामन्याबद्दल बोलताना म्हणाला.

विल्यमसन दुखापतीने बेजार असल्याने न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद टॉम लॅथमकडे असेल. ‘‘ही मालिका म्हणजे खूप मोठे आव्हान आणि जबाबदारी असेल माझ्याकरता. भारतीय संघ बलवान आहे आणि चांगल्या लयीतही आहे. आम्ही टी-20 मालिकेत काय झाले याचा जास्त विचार करणार नाही. नवा समूह नवे क्रिकेट खेळेल इतकेच मी सांगू शकतो. 2 मीटर ताडमाड उंचीच्या कायल जेमीसन न्यूझीलंड संघाचे नवे आकर्षण असेल’’, असे टॉम लॅथम म्हणाला.

भारतीय संघातील प्रत्येक जागेकरता खूप चुरस आहे. सलामीला पृथ्वी शॉ आणि मयांक आगरवाल यायची शक्यता आहे. दरम्यान केदार जाधवला सामना खेळायची संधी कधी दिली जाते याकडेही लक्ष असेल. गेले काही सामन्यात संघात असून सतत बाहेर बसलेल्या कुलदीप यादवला संधी देणे गरजेचे आहे. टी-20 मालिकेत उत्तम कामगिरी करणार्‍या शार्दूल ठाकूरला अंतिम संघात जागा मिळेल असे वाटते.

सेडन पार्कच्या खेळपट्टीवरचे बरेचसे गवत काढण्यात आले आहे आणि सतत रोलिंग चालू असल्याचे दिसले. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांना मदत करेल अशी खेळपट्टी तयार करण्याचा प्रयत्न असेल. न्यूझीलंड संघाच्या गेल्या काही सामन्यातील खराब कामगिरीमुळे स्थानिक प्रेक्षकांच्यात पहिल्या सामन्याकरता जास्त उत्साह दिसत नाही ही संयोजकांकरता चिंतेची बाब झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian team captain Virat Kohli tribute to Kobe Bryant