पुन्हा एकदा क्रमवारीचा प्रश्‍न

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

टी- २० मालिका जिंकल्यानंतर विंडीज संघावर एकदिवसीय मालिकेतही वर्चस्व राखण्याचे लक्ष्य भारतीय संघाने ठेवले असले, तरी त्यांच्यासमोर पुन्हा एकदा फलंदाजीच्या क्रमवारीचा प्रश्‍न तेवढ्याच तीव्रतेने उभा आहे.

प्रेव्हिडन्स (गयाना) - एकदिवसीय विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील निर्णायक क्षणी आलेल्या अपयशानंतर भारतीय संघ आता नव्या उत्साहाने विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी मोठ्या ताकदीने उतरेल. टी- २० मालिका जिंकल्यानंतर विंडीज संघावर एकदिवसीय मालिकेतही वर्चस्व राखण्याचे लक्ष्य भारतीय संघाने ठेवले असले, तरी त्यांच्यासमोर पुन्हा एकदा फलंदाजीच्या क्रमवारीचा प्रश्‍न तेवढ्याच तीव्रतेने उभा आहे.

या सामन्याने शिखर धवन पुन्हा एकदा रोहितच्या साथीत सलामीला खेळणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चौथ्या क्रमांकाचाच नव्हे, तर एकूणच फलंदाजीच्या क्रमवारीचा प्रश्‍न नव्याने उभा राहिला आहे. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा)धवन सलामीला खेळल्यानंतर लोकेश राहुलला चौथ्या क्रमांकाला पसंती मिळू शकेल. त्यानंतर केदार जाधव, रिषभ पंत यांना संधी मिळेल. मधल्या फळीतील उर्वरित एका जागेसाठी मनीष पांडे आणि श्रेयस अय्यर यांच्यात ‘टॉस’ होईल. पण, ही क्रमवारी निश्‍चित राहील असे नाही. टी- २० मालिकेत पांडे अपयशी ठरल्यामुळे आता एकदिवसीय मालिकेसाठी श्रेयस अय्यरचा विचार होऊ शकतो. 

गोलंदाजीचा विचार केल्यास भारताला पर्यायांची कमी नाही. त्यातही भुवनेश्‍वर, महंमद शमी ही जोडी निश्‍चित राहील. त्यानंतर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून नवदीप सैनीला पदार्पणाची संधी मिळेल. फिरकी गोलंदाजांची निवड करताना देखील भारताकडे रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल असे पर्याय राहतील. 

विंडीज संघाला दुबळे म्हणण्यापेक्षा बेभरवशी अधिक मानले जाते. त्यांच्या कामगिरीवरून आतापर्यंत हेच दिसून आले आहे. यानंतरही त्यांची आक्रमकता नाकारता येत नसल्यामुळे आणि गेल मालिकेत खेळणार असल्यामुळे त्यांना कमी लेखून चालणार नाही. टी- २० मालिकेत भारताचे निर्भेळ वर्चस्व राहिले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील ते अपेक्षित आहे. ते राहणार याचा विश्‍वास असला, तरी तो सार्थ ठरविण्यासाठी मैदानावर उतरण्यापूर्वी फलंदाजीच्या क्रमवारीसारखे छोटे प्रश्‍न त्यांना सोडवावेच लागतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian teams batting rankings question