कुस्तीगीरांना जागतिक पदकापेक्षा ऑलिंपिक पात्रतेची संधी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 September 2019

जागतिक पदकाबरोबरच ऑलिंपिक पात्रतेची संधी असल्याने भारतीय कुस्तीगीरांचा खरा कस जागतिक स्पर्धेत लागणार आहे. भारतीय मार्गदर्शक ऑलिंपिक पात्रतेपेक्षाही जागतिक पदक महत्त्वाचे असल्याचे सांगत आहेत. प्रत्यक्षात भारतीय कुस्तीगीर ऑलिंपिकसाठी किती तयार आहेत हेही या स्पर्धेतून दिसेल.

मुंबई : जागतिक पदकाबरोबरच ऑलिंपिक पात्रतेची संधी असल्याने भारतीय कुस्तीगीरांचा खरा कस जागतिक स्पर्धेत लागणार आहे. भारतीय मार्गदर्शक ऑलिंपिक पात्रतेपेक्षाही जागतिक पदक महत्त्वाचे असल्याचे सांगत आहेत. प्रत्यक्षात भारतीय कुस्तीगीर ऑलिंपिकसाठी किती तयार आहेत हेही या स्पर्धेतून दिसेल.

बजरंग पुनिया तसेच विनेश फोगत यांच्यावर जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदकाची मदार असेल, तर अन्य कुस्तीगीरांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यामुळे किमान ऑलिंपिक पात्रतेच्या आशा उंचावलेल्या आहेत. नूर सुलतान येथे होणाऱ्या या  स्पर्धेतून ऑलिंपिकमध्ये असलेल्या सहा गटासाठी प्रत्येकी सहा कुस्तीगीर पात्र ठरतील.

या स्पर्धेपूर्वी बजरंगने चार, तर विनेशने तीन स्पर्धात सुवर्णपदक जिंकले आहे. बजरंग जागतिक क्रमवारीत अव्वल आहे, त्यामुळे त्याच्याकडून सुवर्णपदकाचीच आशा आहे, पण विनेश जर कौशल्यास तंदुरुस्तीची जोड देऊ शकली, तर या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेली ती भारतीय पहिली महिला कुस्तीगीर होऊ शकेल.

ऑलिंपिक ब्रॉंझनंतर साक्षी मलिकला फारसे यश लाभलेले नाही. मात्र त्याचवेळी दिव्या काक्रणची यशाची भूक खूपच आहे. त्यामुळे तिच्याकडून जास्त आशा आहेत, पूजा धांदा, सरीता मोरचीही तयारी चांगली आहे. पुरुषात सुशील कुमार किती वाटचाल करेल याकडे लक्ष आहे. नवोदित दीपक पुनिया, राहुल आवारे, तसेच गुरप्रीत सिंग आणि हरप्रीत सिंग हे पदकाचे दावेदार नक्कीच आहेत.

फ्रीस्टाईल संघातील बहुतेक कुस्तीगीरांना जागतिक स्पर्धेसारख्या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आहे, त्यामुळे या स्पर्धेचे दडपण असण्याचा प्रश्‍नच नाही. स्पर्धेच्या ठिकाणी दहा दिवस सराव केल्याचा नक्कीच चांगला फायदा होईल.
- जगमिंदर सिंग, फ्रीस्टाईल मार्गदर्शक.

ग्रीकोत आपली कामगिरी सुधारत आहे. आशियाई स्पर्धेतील चार पदकानंतर इटली, बेलारुस तसेच जॉर्जियातही यश मिळवले आहे. कझाकस्तानमध्ये चांगले सराव शिबिर झाले. स्पर्धेतील चांगल्या कामगिरीची आशा आहे, पण खूप काही ड्रॉवर अवलंबून असेल.
- हरगोविंद सिंग, ग्रीको रोमन मार्गदर्शक.

संघातील सर्वच कुस्तीगीर जागतिक स्पर्धेसाठी तयार आहेत. आम्ही या स्पर्धेसाठी कसून तयारी केली आहे. या स्पर्धेद्वारे जास्तीत जास्त ऑलिंपिक पात्रता मिळवण्याचे आमचे लक्ष्य आहे.
- कुलदीप सिंग, महिला संघ मार्गदर्शक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian wrestlers target olympic qualification in world championship