esakal | टीम इंडियाचा श्रीलंका दौऱ्यावरील प्लॅन ठरला!
sakal

बोलून बातमी शोधा

Team India

टीम इंडियाचा श्रीलंका दौऱ्यावरील प्लॅन ठरला!

sakal_logo
By
सुशांत जाधव

Indias tour of Sri Lanka : भारतीय संघाचे श्रीलंका दौऱ्यातील वेळापत्रक निश्चित झाले आहे. विराटच्या नेतृत्वाखालील संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना श्रीलंकेतील मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी शिखर धवनच्या नेतृत्वाखाली दुसरा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. भारतीय संघ या दौऱ्यावर तीन वनडे आणि 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 13 ते 25 जुलै दरम्यान भारत-श्रीलंका यांच्यांतील मर्यादित सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेचे ब्रॉडकास्टींगचे अधिकार असलेल्या सोनीने भारताच्या श्रीलंका दौऱ्यासंदर्भात सोमवारी माहिती दिली आहे. (Indias tour of Sri Lanka announced on to be played between July 13 and 25)

हेही वाचा: IPL 2021:उर्वरित सामने 19 सप्टेंबरपासून; दसऱ्या दिवशी फायनल?

सोनी ब्रॉडकास्टिंग चॅनेलने ट्विटच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, वनडे मालिकेने भारताच्या श्रीलका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. 13, 16 आणि 18 जुलैला वनडे सामने रंगतील. त्यानंतर 21, 23 आणि 25 तारखेला टी- 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. सामन्याचे ठिकाण अद्याप गुलदस्त्यातच आहे. याशिवाय भारतीय संघाची घोषणा देखील अद्याप झालेली नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. 4 ऑगस्टपासून भारताच्या या कसोटी दौऱ्याला सुरुवात होईल.

एका बाजूला भारतीय संघ कसोटीच्या मोठ्या दौऱ्यावर गेला असताना दुसऱ्या बाजूला मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी स्वतंत्र संघ श्रीलंकेला पाठवण्यात येणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील या संघात अनेक नवोदित खेळाडूंना संधी मिळू शकते. ब्रॉडकास्टिंगकडून दौऱ्याच्या तारखा फिक्स झाल्याचे समोर आल्यानंतर आता टीम इंडियात कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या दौऱ्यावर राहुल द्रविड कोचच्या रुपात श्रीलंकेला जाणार आहेत.

loading image