INDvSA : पोरांनी मैदान गाजवलं; दोन दिवस आधीच केली 'विजयादशमी' साजरी!

INDvSA
INDvSA

विशाखापट्टणम : वेगवान गोलंदाज महंमद शमी आणि डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा यांनी पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या अखेरच्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाला नेस्तनाबूत करत कसोटी मालिकेत घरच्या मैदानावरील भारताच्या विजयी मोहिमेस सुरवात केली.

विजयासाठी 395 धावांच्या आव्हानासमोर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 191 धावांत गुंडाळून भारताने पहिला कसोटी सामना पाचव्या दिवशी 203 धावांनी जिंकला. शमीने पाच, तर जडेजाने चार गडी बाद केले. दोन्ही डावांत शतकी खेळी करणारा रोहित शर्मा सामन्याचा मानकरी ठरला. 

सामन्याच्या शेवटच्या दिवस भारतीय फिरकी गोलंदाज गाजवतील अशी खात्री होती. पण, महंमद शमीने सर्व जाणकारांचे अंदाज चुकवत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पाचव्या दिवसाची चांगली सुरवात अश्‍विनने डी ब्रुईनचा त्रिफळा उडवून केली. त्यानंतर मैदानावर महंमद शमीच्या वेगवान गोलंदाजीचे राज्य होते. शमीने तेम्बा बावुमा, कप्तान फाफ डु प्लेसी आणि पहिल्या डावात क्वींटन डीकॉक या तीनही बिनीच्या फलंदाजांचा त्रिफळा उडवला.

शमीने आज जणू यष्ट्यांचा नेम धरुनच गोलंदाजी केली. खेळपट्टीने शमीला साथ दिली. बावुमा बोल्ड झाला तो चेंडू भसकन खाली राहिला. डु प्लेसी आणि डीकॉकचा स्वींगचा अंदाज चुकला. मुख्य फलंदाज बाद झाल्यावर विजयाचा मार्ग सोपा झाला. 

लढत देणाऱ्या एडन मार्करमला रवींद्र जडेजाने त्याच्याच गोलंदाजीवर भन्नाट झेल पकडून बाद केले. दक्षिण आफ्रिकेचे 8 फलंदाज फक्त 70 धावांमधे तंबूत परतल्यावर वाटले होते की, विजय लवकर हाती लागेल, पण त्याच वेळेला पीएड्‌ट आणि पदार्पण करणाऱ्या मुथ्थुस्वामीने संयमी फलंदाजी करून किल्ला लढवला. परत गोलंदाजी करायची संधी मिळाल्यावर शमीने पीएड्‌टचा त्रिफळा उडवून अडसर दूर केला. मुथ्थुस्वामीच्या प्रयत्नांना रबाडाने दिलेली साथ पुन्हा एकदा शमीने संपवली आणि भारताचा 203 धावांचा विजय साकारला गेला. 

घरच्या मैदानांवर 5 कसोटी सामन्यांच्या मोसमाची विजयी सुरवात भारतीय संघाने केली. विसाखापट्टणम कसोटीतला विजय सांघिक प्रयत्नांचा ठरला ही लक्षणीय बाब म्हणता येईल. फलंदाजीत रोहित शर्मा, मयांक आगरवाल आणि चेतेश्‍वर पुजाराने चमक दाखवली. गोलंदाजीत अश्‍विन सोबत रवींद्र जडेजा आणि महंमद शमीने भेदक मारा केला. तीन दिवसांच्या सुट्टीनंतर पुण्यात दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. 

संक्षिप्त धावफलक :

भारत 7 बाद 502 घोषित आणि 4 बाद 323 घोषित वि.वि. दक्षिण आफ्रिका 431 आणि 191 (एडन मार्करम 39, एस. मुथ्थुस्वामी 49, डेन पीएड्‌ट 56 -107 चेंडू, 9 चौकार, 1 षटकार, महंमद शमी 10.5-2-35-5, रवींद्र जडेजा 25-6-87-4, आर. अस्विन 20-5-44-1)

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com